गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे, नियमित करणे अथवा स्थलांतरीत करणे याबाबतचे सुस्पष्ट धोरण राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. यानुसार जिल्ह्यात एकूण ९२ अनाधिकृत धार्मिक स्थळे आहेत. आक्षेप व हरकती मागितल्यावर प्रक्रियेनंतर या धार्मिक स्थळांबाबत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी राज्याच्या गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अध्यादेशावर कार्यवाही न झाल्याने न्यायालयाने नाराजी जाहीर केल्यानंतर धार्मिक स्थळांबाबत शासन व प्रशासनाने सुस्पष्ट धोरण राबवावे, असे निर्देश दिले. या निर्देशाची गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ९२ अनाधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. २९ सप्टेंबर २००९ पूर्वीपासून ९२ अनाधिकृत धार्मिक स्थळे आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५, आरमोरी तालुक्यात १२, एटापल्ली तालुक्यात ६, अहेरी तालुक्यात ६, सिरोंचा तालुक्यात १, भामरागड तालुक्यात २ व सर्वाधिक देसाईगंज तालुक्यात तब्बल ६० धार्मिक स्थळे अनाधिकृत आहेत. अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत नियमितीकरण, निष्कासन व स्थलांतरण करण्याच्या कारवाईबाबत जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आहेत. कार्यक्रम जाहीर करण्याचे दिले आदेशसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत करावयाच्या कारवाईसंदर्भात कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना तालुकास्तरावरील तहसीलदार, नगर पालिकेचे मुख्याधिकारी व नगर पंचायत क्षेत्रातील प्रशासक यांना दिल्या आहेत. तालुकास्तरावरील प्रशासनाकडून येत्या काही दिवसात नागरिकांकडून अस्तित्वात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत आक्षेप व हरकती मागविण्यात येणार आहे.
९२ अनधिकृत धार्मिक स्थळे
By admin | Published: October 28, 2015 1:34 AM