शेतकरी अपघात विम्याचे ९९ प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:00 AM2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:01:01+5:30
शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.
सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत सदर योजनेअंतर्गत जिल्हाभरातून एकूण १७५ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे २६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य:स्थितीत विमा कंपनीकडे तीन वर्षाचे मिळून एकूण २० प्रस्ताव प्रलंबित आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व वारसदाराकडे मिळून एकूण ७९ प्रस्ताव प्रलंबित आहेत. सन २०१६-१७ या वर्षात विमा कंपनीकडे ८ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे १० प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे १० व कृषी अधिकारी कार्यालयाकडे ६९ प्रस्ताव तसेच २०१९-२० वर्षातील केवळ दोन प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
शेतकरी अपघात विमा योजनेचे सन २०१७-१८ वर्षात ३८ व २०१८-१९ वर्षात १२ असे एकूण ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊन शासनाचे विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.
विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी केल्यानंतर हे प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जातो. योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी दिल्यानंतर संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो.
विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबी
रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकºयाला विमा दिला जातो.
पात्रतेच्या अटी व आवश्यक दस्तावेज
गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दस्तावेज प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणून त्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र.६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज.
विम्यापोटी मिळणारी नुकसानभरपाई
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.