गडचिरोली : जिल्ह्यात अवैध दारू व तंबाखू विक्री बंद करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुक्तिपथ अभियानाच्या समन्वयातून कृती करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून दिल्या होत्या. त्यासाठी 'ॲक्शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने कोरची लीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करून तालुक्यातील अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
कोरची पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तिपथ व पोलीसपाटलांची नुकतीच बैठक पार पडली. मुक्तिपथ तालुका चमूने तालुक्यातील अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांची यादी पोलीस विभागास सादर करून त्यावर चर्चा करण्यात आली. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दारूविक्री बंद करणे, दारूबंदी असलेल्या गावात दारू सुरू झाली असल्यास पोलीसपाटील यांच्या मदतीने बैठक लावणे, ठोक दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणे, दर महिन्याला आढावा बैठकीचे आयोजन करणे आदींचे नियोजन करण्यात आले. सोबतच गावातील अवैध दारू व तंबाखूविरोधात उत्कृष्ट कार्य बजावणाऱ्या पोलीसपाटलांचे पोलीस ठाण्याच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एस.आर.फडोळ, मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके, पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीसपाटील उपस्थित होते.