कोया पुनेम संमेलनात सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण
By admin | Published: June 26, 2016 01:18 AM2016-06-26T01:18:35+5:302016-06-26T01:18:35+5:30
स्थानिक लिंगोबाबा देवस्थान भामरागडच्या वतीने विरांगणा राणी दुर्गावती मडावी बलिदान दिनाचे औचित्य साधून कोया पुनेम संमेलन ....
सप्तरंगी ध्वजारोहण : भामरागडात लिंगोबाबा देवस्थानतर्फे कार्यक्रम
भामरागड : स्थानिक लिंगोबाबा देवस्थान भामरागडच्या वतीने विरांगणा राणी दुर्गावती मडावी बलिदान दिनाचे औचित्य साधून कोया पुनेम संमेलन व सल्ला गांगरा शक्तीचा अनावरण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले.
उद्घाटन नारायण तलांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मनीरावण दुग्गा होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वर्धा येथील गोंडी साहित्यिक मारोती उईके, आनंद मडावी, खुशाल सुरपाम, प्रमुख अतिथी म्हणून हरिभाऊ मडावी, विठोबा मडावी, मदनी बोगामी, जोगा उसेंडी उपस्थित होते.
देशातील प्रत्येक गोंडियन समाजातील मुला, मुलींनी रणमर्दानी राणी दुर्गावती मडावी, कोयावंशीय कोयतूर गोंड सम्राट लंकापर्वत रावण मडावी यांचा आदर्श ठेवून वाटचाल केली तर आपल्या समाजावर कधीच अन्याय होणार नाही. बोगस लोकांची घुसखोरीही होणार नाही. गोंडीयन समाजाने आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे, असे आवाहन मारोती उईके यांनी केले. संमेलनात खुशालसिंह सुरपाम म्हणाले, गोंडी समाजाला लुबाडणाऱ्या समाजकंटकांना थारा देऊ नका, अनेक धर्माने आपल्या स्वार्थासाठी गोंडी समाजाचा वापर चालविला आहे. कधी वनवासी तर कधी आदिवासींच्या नावावर प्रत्येक वेळी गोंड समाजावरच अन्याय होत असतो. त्यामुळे गावागावात गोंडवाना गोटूलची स्थापना करावी, तसेच गोंड धर्माचे धर्मगुरू पहांदी व कुपार लिंगोचे त्रिशूल मार्ग आचरणात आणावे, गोंडी धर्मानुसार आचरण करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिच्चू वड्डे, दिनेश मडावी, वसंत इष्टाम, भारती इष्टाम, डॉ. भारती बोगामी, निर्मला सडमेक, मालसू दुर्वे, नरोटे, विडपी यासह आदिवासी बांधवांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य गावातील मातृशक्ती व पितृशक्ती उपस्थित होते.