१८ दिवसांनंतर जंगली हत्तींचा कळप पुन्हा कुरखेडा तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 05:00 AM2021-12-16T05:00:00+5:302021-12-16T05:00:35+5:30
२२ ते २६ नाेव्हेंबरदरम्यान याच हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर ते देसाईगंज तालुक्यात गेले. देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींकडून हाेणाऱ्या नुकसानीपासून कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा साेडला हाेता. देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेशही केला हाेता; परंतु एक-दाेन दिवसांतच पुन्हा देसाईगंज तालुक्यात व त्यानंतर आरमोरी तालुक्यात हत्ती परतले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : देसाईगंज व आरमाेरी तालुक्यात धुमाकूळ घालून पिकांचे नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींचा कळप १८ दिवसांनंतर पुन्हा कुरखेडा तालुक्यात दाखल झाला. या कळपाने तालुक्यातील अरतताेंडी येथे मंगळवारी मध्यरात्री आश्रमशाळा संरक्षक भिंत व पिकांची नासधूस केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा हत्तींविषयी धास्ती निर्माण झाली आहे.
२२ ते २६ नाेव्हेंबरदरम्यान याच हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर ते देसाईगंज तालुक्यात गेले. देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींकडून हाेणाऱ्या नुकसानीपासून कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा साेडला हाेता. देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेशही केला हाेता; परंतु एक-दाेन दिवसांतच पुन्हा देसाईगंज तालुक्यात व त्यानंतर आरमोरी तालुक्यात हत्ती परतले. तब्बल १८ दिवसांनंतर परत येऊन मंगळवारी, दि. १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील महादेवगड आश्रमशाळेच्या संरक्षक भिंतीची मोडतोड केली, तसेच येथील शेतकऱ्यांच्या धानाचे पुंजणे उपसून नासधूस केली. यात शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अरतताेंडी येथील सायत्रा कुमरे, ईश्वर नरोटे, देवाजी तुलावी, क्षीरसागर दखणे, आदी शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे हत्तींनी उपसले. यात शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी हेमंत खुणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, हत्तींचा कळप पुन्हा परतल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हत्तीची दहशत शेतकऱ्यांमध्ये असून नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.
हे आहे हत्तींचे लक्ष्य
- जंगली हत्ती गेल्या दाेन महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहेत. यात ते शेतातील पिकांची माेठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत. जंगली हत्ती विशेषत: धानाचे पुंजणे, तुरीचे पीक, उडीद, मूग यासारखी कडधान्य पिके, घरी संकलित माेहफुले, आदी खात असून नासधूस करीत आहेत. याशिवाय शेतातील माेटार पंप व त्याचे लाेखंडी पाईप, प्लास्टिक पाईप, रस्त्यालगतचे लाेखंडी बाेर्ड व लहान घरे, आदींची नासधूस करीत आहेत. हे सर्व जंगली हत्तींचे लक्ष्य ठरत आहेत.