अखेर ‘त्या’ डॉक्टरांची पोलिसांसमोर हजेरी

By admin | Published: May 1, 2017 02:10 AM2017-05-01T02:10:56+5:302017-05-01T02:10:56+5:30

भामरागड तालुक्याच्या बिनागुंडाजवळील धबधब्यामध्ये बुडून डॉ. आर. एल. जामी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर

After all, those 'doctors' attendance must be presented before the police | अखेर ‘त्या’ डॉक्टरांची पोलिसांसमोर हजेरी

अखेर ‘त्या’ डॉक्टरांची पोलिसांसमोर हजेरी

Next

डॉ. जामी प्रकरण : सहा डॉक्टरांसह १४ जणांचे लाहेरी पोलिसांनी नोंदवून घेतले बयाण
गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या बिनागुंडाजवळील धबधब्यामध्ये बुडून डॉ. आर. एल. जामी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तब्बल १५ दिवसांपाासून रजेवर असलेल्या डॉक्टरांनी अखेर रविवारी लाहेरी पोलिसांसमोर हजेरी लावली. पोलिसांनी सहा डॉक्टर व नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविले. यामध्ये देसाईगंजचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप कांबळे, डॉ. विजय आकोलकर, डॉ. सुरेश मोटे, डॉ. किशोर वाघ, डॉ. बन्सोड, डॉ. अनुपम महेश गौरी यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांनी नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण घेतले. तसेच बिनागुंडावासीयांचेही या प्रकरणी पोलिसांनी बयाण नोंदवून घेतले. प्रशासनाने अद्याप या बेधुंद डॉक्टरांवर कारवाई केलेली नसल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भामरागडवासीयांनी केला आहे.
१६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील जवळपास १५ ते १८ डॉक्टर कुठलेही प्रशासकीय काम नसताना भामरागड येथे गेले होते. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान भामरागड ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. जामी यांना प्रशासकीय धाक दाखवून बिनागुंडाजवळील धबधब्यामध्ये पार्टीकरिता नेण्यात आले. यावेळी धबधब्यामध्ये बुडून डॉ. जामी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारानंतर पार्टीतील सर्व डॉक्टरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. यातील काही डॉक्टर तर १५ दिवसांपासून रजेवर गेले होते. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर या प्रकरणामध्ये हालचालींना वेग आला असून रविवारी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण घेण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)

प्रशासन गप्प का ?
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असताना काही वैद्यकीय अधिकारी व्यवस्था सुधाण्याऐवजी बेधुंदपणे वागून प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. जामीचा मृत्यू हे त्याचे जिवंत उदाहरण होय. मात्र प्रशासनातील काही वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्याना आवरणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळेच हे डॉ. जामीच्या मृत्यूनंतर फरार होतात. यांना एकाचवेळी १५ दिवसांच्या सुट्या सुध्दा मिळतात. हे सर्व घडत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून विविध बाबी तपासण्यास सुरूवात केली आहे. प्रशासनाने चौकशींचा फार्स तयार केला आहे. परंतु समपदस्त अधिकाऱ्यांकडून चौकशी कुठल्या पद्धतीने होणार याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे प्रकरणाची गंभीरता ओळखून विभागीय समिती स्थापन करून चौकशी करावी व त्या पाटीर्तील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तोपर्यंत निलंबित करावे, अशी मागणी भामरागडच्या नागरिकांनी केली आहे.

 

Web Title: After all, those 'doctors' attendance must be presented before the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.