आष्टी येथील कृषी केंद्र संचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:01 AM2019-05-17T00:01:27+5:302019-05-17T00:02:18+5:30
कपाशीचे प्रतिबंधात्मक बियाणे आढळल्याप्रकरणी आष्टी येथील कृषी केंद्र चालक अनिल बाबुराव अल्लुरवार (५२) व वाहन चालक दिवाकर मानपल्लीवार दोघेही रा. आष्टी यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांचा पीसीआर सुनावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : कपाशीचे प्रतिबंधात्मक बियाणे आढळल्याप्रकरणी आष्टी येथील कृषी केंद्र चालक अनिल बाबुराव अल्लुरवार (५२) व वाहन चालक दिवाकर मानपल्लीवार दोघेही रा. आष्टी यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांचा पीसीआर सुनावला आहे.
अनिल अल्लुरवार हे प्रतिबंधात्मक कपाशीच्या बियाण्यांची विक्री करीत आहेत, अशी गोपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार अल्लुरवार यांच्या गोदामाची चौकशी केली असता, गोदामामध्ये काहीच आढळून आले नाही. मात्र गोदामापासून काही दूर अंतरावर संशयास्पद स्थितीत एक मेटॅडोर उभा होता. या मेटॅडोरमध्ये वाहन चालक बसून होता. मेटॅडोरची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, मेटॅडोरमध्ये प्रतिबंधात्मक कपाशीचे बियाणे आढळून आले. त्यानुसार कृषी केंद्र चालक अनिल अल्लुरवार व वाहन चालक दिवाकर मानपल्लीवार या दोघांविरोधात सहबियाणे अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायदा अन्वये कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. दोघांनाही गडचिरोली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मेटॅडोरमधून ३० लाख ४० हजार रुपयांचे कपाशीचे बियाणे तसेच तीन लाख रुपयांचा मेटॅडोर असा एकूण ३३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बोगस बियाण्यांचे रॅकेट कार्यरत
महाराष्ट्रात प्रतिबंध घालण्यात आलेले बियाणे नजीकच्या तेलंगणात राज्यातून आणले जातात. कमी किमतीत सदर बियाणे उपलब्ध होत असल्याने शेतकरी खरेदी करतात. दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये कपाशीचा पेरा वाढत चालला आहे. त्यामुळे बोगस बियाणे विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सर्वच कृषी केंद्रांची अधूनमधून चौकशी करावी, अशी मागणी आहे.