गडचिरोली : जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. सलग २७ वर्षे टिकून असलेल्या दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी शासनाकडे करीत अहेरी नगरपंचायतीच्या १८ नगरसेवकांनी दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.
दारूमुळे होणारे दुष्परिणाम, आर्थिक नुकसान व महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील विविध गाव संघटन, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन दारूमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दारूबंदी आंदोलनाची दखल घेऊन शासनाने १९९३ मध्ये शासकीय दारूबंदी लागू केली. १९९३ पासून २०१५ पर्यंत गावागावांत दारूबंदी लागू झाली. जिल्हाभरातील १ हजाराहून अधिक गावांसह अहेरी नगरपंचायतच्या संपूर्ण म्हणजेच १८ नगरसेवकांनीसुद्धा जिल्हा दारूबंदीसाठी समर्थन दर्शविले आहे. ही अंमलबजावणी अधिक प्रबळ करण्याची विनंती शासनाकडे केली आहे.
अहेरीच्या माजी अध्यक्ष हर्षा ठाकरे, माजी उपाध्यक्ष कमला पडगिलवार, माजी नगरसेवक संजय झाडे, अन्नपूर्णा सिडाम, नारायण सिडाम, अर्चना वीरगीनवार, शेख मोहम्मद, विश्वनाथ आत्राम, नितीन डोंतुलवार, प्राजक्ता पेदापल्लीवार, गिरीश मद्देलावार, शैलेश पटवर्धन, ममता पटवर्धन, श्रीनिवास चटारे, मालुताई इष्टाम, रेखा सडमेक, स्मिता येमूलवार, अमोल मुक्कावार आदी नगरसेवकांनी दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे.
बाॅक्स....
२१ जणांनी केला दारू साेडण्याचा संकल्प
मुक्तिपथ अभियानातर्फे गुरुवारी मुलचेरा, एटापल्लीत तालुका क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकच्या माध्यमातून २१ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला. मुलचेरा शहरातील गोंडवाना चौकातील जि. प. शाळेजवळीत मुक्तिपथ तालुका कार्यालयात १० तर एटापल्ली शहरातील आनंद नगरात गुरुवारी आयोजित व्यसन उपचार क्लिनिकमध्ये ११ रुग्णांनी उपचार घेतला. दोन्ही क्लिनिकच्या माध्यमातून एकूण २१ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला आहे. या वेळी रुग्णांना मार्गदर्शनदेखील करण्यात आले.