अहेरी रुग्णालय अस्थिपंजर

By admin | Published: October 27, 2015 01:35 AM2015-10-27T01:35:57+5:302015-10-27T01:35:57+5:30

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयात निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे या

Aheri hospital bishopinger | अहेरी रुग्णालय अस्थिपंजर

अहेरी रुग्णालय अस्थिपंजर

Next

प्रतीक मुधोळकर ल्ल अहेरी
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयात निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे या रुग्णालयाची आरोग्यसेवा अस्थिपंजर झाली आहे. विशेष म्हणजे नऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना केवळ तीन पदे भरण्यात आली आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत.
सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी तसेच मुलचेरा या पाच तालुक्यांचा भार अहेरी रुग्णालयावर आहेत. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय व मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहेत. मात्र या रुग्णालयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात सोयीसुविधा नाही. त्याचबरोबर याही रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. काही रुग्णालये आरोग्य सेविकांच्या भरवशावरच चालविले जात आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात एखादा गंभीर रुग्ण दाखल झाल्यास त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे अहेरी उपजिल्हा रुग्णालयात बाराही महिने रुग्णांची गर्दी राहते.
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांची नऊ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत. त्यापैकी एक अधिकारी मागील एक वर्षांपासून नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आला आहे. शस्त्रक्रिया, स्त्री व प्रसूती, बधिरीकरण तज्ज्ञ, भेषक, आश्रमशाळा, नेत्र विभाग या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा भार कार्यरत डॉक्टरांना उचलावा लागत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी व वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय उमाटे व डॉ. आर. एल. हकीम यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह बाह्यरुग्ण लिपीक, परिसेविका, सहाय्यक अधिसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक परिचारिका, प्रसविका, औषध निर्माता, वाहनचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी एकूण आठ पदे रिक्त आहेत. फिरते आरोग्य पथक व शाळा तपासणीचे वैद्यकीय अधिकारी, बाह्यरुग्ण विभाग सांभाळत असतात. शिपाई कक्ष सेवक, वर्णोपचार, बाह्यरुग्णसेवक, सफाईगार, शस्त्रक्रिया, गृहपरिचर अशी एकूण सहा पदे रिक्त आहेत. सफाई कामगारांची पदेही रिक्त असल्याने रुग्णालयात साफसफाई ठेवण्यास अडचण जात आहे.
रिक्तपदांमुळे वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नाही. परिणामी रुग्णांची हेळसांड होते.
ही बाब टाळण्यासाठी त्याचबरोबर कार्यरत कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्तपदे भरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खाटा वाढणार मात्र रिक्तपदांचे काय?
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात सध्य:स्थितीत ५० खाटांची व्यवस्था आहे. याच इमारतीवर वरचा मजला चढवून आणखी ५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता दुप्पट होणार आहे. अगदी काही दिवसांतच बांधकामालाही सुरुवात होणार आहे. वाढीव क्षमतेमुळे रुग्णांना राहण्याची सुविधा निर्माण होईल. मात्र रिक्तपदांचा भार असाच कायम राहिल्यास रुग्णालयात आलेल्या रुग्णांना सुविधा कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यातील ही गंभीर समस्या टाळण्यासाठी रिक्तपदे भरणे गरजेचे आहे. रिक्तपदे भरण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली व निवेदनसुद्धा देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत शासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या परिसरातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सत्तेत आलेल्या नवीन शासनाने तरी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

रुग्णालयात शीतपेटी नाही
रुग्णालयात एखादा रुग्ण मृत्यू पावल्यास त्याला शीतपेटीत ठेवल्या जाते. त्यामुळे मृतदेह खराब होत नाही. मात्र अहेरी उपजिल्हा रुग्णालयात शीतपेटीच नाही. शवविच्छेदनगृहात विद्युत पुरवठासुद्धा करण्यात आलेला नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेवर टॉर्चच्या साहाय्याने शवविच्छेदन करण्याचे प्रकारसुद्धा घडले आहेत. त्यामुळे याठिकाणी विद्युत पुरवठा असणे अत्यंत आवश्यक आहे.

२००५ पासून सतत अहेरी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टारांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयात उपचाराचे साहित्यजरी भरपूर असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आम्ही पाहिजे ती रुग्णसेवा देऊ शकत नाही. रिक्तपदांबाबत वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा आपण केला आहे. मात्र अजूनपर्यंत काहीच झाले नाही. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.
- डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

Web Title: Aheri hospital bishopinger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.