गंगामाय महोत्सवाने अहेरी नगरी दुमदुमली
By Admin | Published: August 5, 2015 01:41 AM2015-08-05T01:41:39+5:302015-08-05T01:41:39+5:30
मागील ३५ वर्षांपासून भोईवाडा येथील गंगामाता मंदिरात गंगामाता महोत्सव साजरा केला जातो.
३५ वर्षांपासून परंपरा : प्राणहिता नदीत झाले मूर्तीचे विसर्जन; भाविकांमध्ये जल्लोष
अहेरी : मागील ३५ वर्षांपासून भोईवाडा येथील गंगामाता मंदिरात गंगामाता महोत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाच्या आयोजनानंतर मंगळवारी माता मूर्तीच्या विसर्जनाने या महोत्सवाची सांगता झाली. मंगळवारी शहराच्या प्रमुख मार्गावरून गंगामाता मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती.
२ आॅगस्टपासून भोईवाडा येथील गंगामाता महोत्सवाला सुरूवात झाली. मंडप आच्छादन, गजम आणणे, मंगल स्नान, गंगामाता मूर्तीची नगर मिरवणूक, स्थापना आदी धार्मिक विधी पार पाडण्यात आले. सोमवारी भोई समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री मधुबन सूर शिक्षणाचा हा समाज प्रबोधन कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी गंगादेवी व शंकरजी यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याला अहेरी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यानंतर गंगामाता मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली व प्राणहिता नदीत गंगामाता मूर्ती विसर्जित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी)