गडचिरोली : ग्रामसभेने दारूविक्रेत्यांच्या कार्यक्रमाला कुणी जायचे नाही, अडीअडचणीत मदत करायची नाही. गुराख्यांनी त्यांच्या गायी-म्हशी राखायच्या नाही, अशा प्रकारे गावबंदीसारखा कठाेर निर्णय घेऊन गावातील दारूविक्रेत्यानी अवैध व्यवसाय पूर्णतः बंद केला. गावात दारूबंदी झाली. ह्या निर्णयामुळे गावाची प्रतिष्ठा वाढली. गावातील भांडण-तंटे कमी झाले. महिलांचे संसार सुरळीत सुरू आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून दारूविक्री मुक्त गाव म्हणून परिसरात ओळख मिळवली. ते गाव आहे बामणपेठ. येथे नुकतेच विजयस्तंभ उभारून अनावरण करण्यात आले.
चामोर्शी तालुक्यातील बामणपेठ हे गाव पाच वर्षांपूर्वी अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध होते. या गावात अवैध दारूविक्री केली जायची. त्यामुळे नेहमी भांडणतंट्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. महिलांना अन्याय-अत्याचार सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून हे गाव अवैध दारूविक्री मुक्त आहे. यावेळी पोलिस पाटील भाऊजी सिडाम, पेसा अध्यक्ष विठ्ठल कन्नाके, प्रभाकर कन्नाके, ग्रा.पं. सदस्य साईनाथ कुळमेथे, विजय कन्नाके, जानकीराम शेडमाके, दसरथ आत्राम, रावजी आत्राम, शैलेश शेडमाके, गोमा आत्राम, दिवाकर शेडमाके, वैशाली कंनाके, मंगला कनाके, चंद्रकला सिडाम, अनिता कन्नाके, मीना कन्नाके, ज्योती कतलाम, शकुंतला शेडमाके यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
विजयस्तंभाचे महत्त्व काय?
अवैध दारूविक्री बंदी झाल्याने गावात शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत हाेते. गावातील लाेकांनी दारविक्री बंदीसाठी केलेले कार्य व एकजूट गावकऱ्यांच्या स्मरणात नेहमी राहावी यासाठी गावात विजयस्तंभ उभारण्यात आले. मुक्तिपथ अभियानाचे आनंद सिडाम यांनी ग्रामस्थांना पेसा कायदा व विजयस्तंभाचे महत्त्व पटवून दिले.