लाेकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : आदिवासी समाज शिक्षित असला पाहिजे, समाजबांधवांनी एकसंघ व जागृत राहून आपल्या हक्कासाठी प्रयत्न केले पाहिजे. आदिवासी समाजातील शहीद व क्रांतिकारकांचे विचार आत्मसात करून समाजबांधवांनी संघर्ष करावा, असे आवाहन करीत प्रत्येक गरजू व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना शासकीय याेजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
अहेरी तालुक्यातील पारंपरिक पेरमिली इलाकापट्टीच्या वतीने काेडसेलगुडम येथे महानायक शहीद गुंडाधुर धुर्वे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून भूमकाल दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाव पेरमा मलय्या माेंडी साकटी हाेते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य ऋषी पाेरतेट, माजी सरपंच बालाजी गावडे, सांबय्या करपेत, शंकर आत्राम, कैलास काेरेत, बाजीराव तलांडी, अनिता आलाम आदी मान्यवर उपस्थित हाेते.
याप्रसंगी भारतीय संविधानाने आदिवासींना दिलेले अधिकार व हक्क तसेच पेसा कायद्याने ग्रामसभांना मिळालेले अधिकार आदींबाबत या कार्यक्रमात मंथन करण्यात आले. यशस्वीतेसाठी कमलापूरचे ग्रा.पं.सदस्य व्यंकटेश कडार्लावार, बाबुराव ताेरेम, लाच्या आत्राम, दामा गावडे आदींनी सहकार्य केले. यावेळी आदिवासी युवक, युवतींनी पारंपरिक गाेंडी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.