नऊ पीएचसींना मिळाल्या रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:25 AM2019-06-22T00:25:38+5:302019-06-22T00:26:26+5:30
जिल्ह्यात आरोग्य सेवेत आवश्यक सुविधांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. विशेष म्हणजे रूग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे वेळेवर रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यास उशिर होतो. प्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय सहाय्यता निधीमधून २० रूग्णवाहिका निर्लेखीत केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आरोग्य सेवेत आवश्यक सुविधांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. विशेष म्हणजे रूग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे वेळेवर रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यास उशिर होतो. प्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय सहाय्यता निधीमधून २० रूग्णवाहिका निर्लेखीत केल्या. यापैकी नऊ रूग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले. दुर्गम भागातील नऊ पीएचसींना नवीन रुग्णवाहिका मिळाल्या.
सदर रूग्णवाहिकांच्या चाव्या रूग्णवाहिका चालकांकडे सोपवून त्यांना रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जि.प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिका निर्लेखनास पात्र झाल्या. यापैकी भामरागड तालुक्यातील आरेवाडा, मन्नेराजाराम, लाहेरी, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, गट्टा, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला, अंकीसा, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका मंजूर झाल्या. यापैकी नवीन नऊ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले असून अंकीसा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच रूग्णवाहिका प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कमलापूर येथील आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. वाहनाअभावी तत्पर आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे सदर आरोग्य केंद्राला स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी यांच्यासह ग्रामस्थांनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पवनकुमार उईके यांच्याकडे निवेदनातून केली होती. शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. अखेर कमलापूर आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कमलापूर पीएचसीच्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन कुमार उईके, गजेंद्र रंधये, अनिल भट, प्रकाश दुर्गे, सुनील भट, नंदू येनगंटीवार व कर्मचारी हजर होते.
उर्वरित ११ केंद्रांनाही मिळणार-डीएचओ
जिल्ह्यातील २० प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २० रुग्णवाहिका नियमाप्रमाणे निर्लेखनास पात्र झाल्या आहेत. संबंधित वाहनाची वय, कालावधी, किमी अंतर व इतर सर्व बाबीनुसार ही वाहने निर्लेखनास पात्र करण्यात आली. मात्र सदर वाहने अजूनही वाहतुकीवर आहेत. केंद्रीय सहाय्यता निधीतून नऊ आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. आता उर्वरित ११ केंद्रांना लवकरच नव्या रुग्णवाहिका मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ११ जुनी वाहने वाहतुकीवर आहेत.