आरमोरी : कोरोना महामारीमुळे जनता भयभीत झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्ण व जनतेला आरोग्यविषयक मार्गदर्शन व उपचारांची खरी गरज आहे. परंतु, तालुक्यातील देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या एकाच कंत्राटी डाॅक्टरांच्या भरवशावर येथील आरोग्य सेवेचा डोलारा उभा आहे.
देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील मानापूर, देलनवाडी, मांगदा, कुलकुली, कोसरी यासह अनेक गावातील रुग्णांना सेवा मिळते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून, अद्यापही या आरोग्य केंद्राला नवीन वैद्यकीय अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी पदाचा तात्पुरता भार वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वागधरे यांच्याकडे आहे. परंतु, त्यांनाच आपले वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे ते देलनवाडी केंद्राला फारसा वेळ देऊ शकत नाहीत.
देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची दोन पदे स्थायी स्वरूपात मंजूर आहेत. मात्र, येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असून, ते भरण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या कंत्राटी मानसेवी डाॅक्टरांच्या भरवशावर आरोग्य केंद्राचा डोलारा असल्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे पर्यायाने आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसरातील कर्मचाऱ्यांना आपत्कालिन परिस्थितीत धावपळ करावी लागते. देलनवाडी येथील आरोग्य केंद्रात स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.