मानधन शिक्षक नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: July 19, 2015 01:41 AM2015-07-19T01:41:41+5:302015-07-19T01:41:41+5:30
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत जिल्ह्यात २४ शासकीय आश्रमशाळा आहे.
दिरंगाई : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत जिल्ह्यात २४ शासकीय आश्रमशाळा आहे. तसेच अहेरी व भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा आहेत. या तिन्ही प्रकल्पात शिक्षकांच्या १०० हून अधिक जागा रिक्त आहे. मात्र प्रकल्प कार्यालयस्तरावरून तासिका तत्वावरील मानधन शिक्षकांना अद्यापही नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे आश्रमशाळेतील अनेक महत्त्वपूर्ण विषयाच्या तासिका होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील कायमस्वरूपी शिक्षक पदभरती अप्पर आयुक्त कार्यालय स्तरावरून केली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाने गडचिरोलीसह तिन्ही प्रकल्पातील शिक्षकांच्या रिक्त जागांकरिता पदभरती घेतली नाही. परिणामी या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांच्या १०० हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता प्रकल्प कार्यालयस्तरावरून दरवर्षी तासिका तत्वावरील नियुक्ती केली जाते. मात्र यंदा २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात गडचिरोलीसह तिन्ही प्रकल्प कार्यालयस्तरावरून मानधन शिक्षकांच्या नियुक्तीकरिता दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गडचिरोली प्रकल्पांतर्गत २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये माध्यमिक मुख्याध्यापकांचे एकूण २२ पदे मंजूर आहेत. यापैकी १८ पदे भरण्यात आली असून चार पदे रिक्त आहेत. उच्च माध्यमिक शिक्षकांची ६१ पदे मंजूर आहेत. यापैकी ४४ पदे भरण्यात आली असून १७ पदे रिक्त आहे. माध्यमिक शिक्षकांचे ८८ पदे मंजूर असून ७६ पदे भरण्यात आली आहे. तर सध्या ११ पदे रिक्त आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांचे दोन पदे रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांचे एकूण १६१ पदे मंजूर आहेत. यापैकी १०४ पदे भरण्यात आली असून प्राथमिक शिक्षकांची सर्वाधिक ५७ पदे रिक्त आहेत. एकट्या गडचिरोली प्रकल्पात शिक्षकांची ८५ पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत. परिणामी आश्रमशाळेतील इंग्रजी, गणित आदीसह अनेक महत्त्वाच्या विषयांच्या तासिका होत नसल्याचे चित्र आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
तासिका तत्वावरील मानधन शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात उमेदवारांचे अर्ज आले आहेत. नियुक्तीबाबत नियोजन झाले असून सर्व आश्रमशाळांमधील रिक्त जागांवर मानधन शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी कार्यालयात शिक्षण कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या तीन-चार दिवसात मानधन शिक्षकांना प्रकल्प कार्यालयाच्या वतीने नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे.
- दशरथ कुळमेथे, प्रभारी प्रकल्प अधिकारी, गडचिरोली
दहावी, बारावीचा अभ्यासक्रम माघारणार
जिल्ह्यातील तिन्ही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने उन्हाळ्यात तासिका तत्वावरील मानधन शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात नियोजन केले जात नाही. या संदर्भातील नियोजन उशीरा होत असल्याने दरवर्षी मानधन शिक्षकांची नियुक्ती जुलैच्या अखेरपर्यंत केली जाते. शिक्षकांच्या रिक्त जागांवर अन्य कुठलेही शिक्षक नसल्याने संबंधित विषय शिक्षकांच्या तासिका होत नाही. परिणामी इयत्ता दहावी व बारावीचा अभ्यासक्रम माघारतो. याचा दहावी, बारावीच्या निकालावरही परिणाम होतो.
इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळेत मानधन शिक्षक रूजू
गडचिरोली प्रकल्पांतर्गत एकमेव इंग्रजी माध्यमांच्या सेमाना परिसरातील शासकीय आश्रमशाळेमध्ये तासिका तत्वावरील मानधन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सदर शाळेत शिक्षक रूजू झाले आहेत, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.