लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सोमवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली व आरमोरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले. धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, कुरखेडा तालुक्यातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. लहान पुलांवरून पाणी चढल्याने अनेक मार्ग ठप्प पडले होते.मागील दीड महिन्यांपासून दरदिवशी पाऊस येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पाऊस थांबण्याची अपेक्षा करीत आहेत. सोमवारी दिवसभर आकाश स्वच्छ होते. त्यामुळे रात्री पाऊस येणार नाही, असा अंदाज होता. मात्र सोमवारी पहाटे ४ वाजेपासून पावसाला सुरूवात झाली. गडचिरोली व आरमोरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. गडचिरोली तालुक्यात सुमारे ८२ मिमी तर आरमोरी तालुक्यात ८४ मिमी पाऊस झाला. धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये सुध्दा ४० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.२ सप्टेंबरपर्यंत ११५१.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १२२२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारण पावसाच्या सुमारे १०६.२ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत १३५४.७ मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत ९० टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिना संपण्यास २८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी शेतात शिरले. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे अनेकांचे शेत खरडून गेले. तसेच रोवलेले धानपीक सुध्दा वाहून गेले. रोवणे आता संपले आहेत. त्यामुळे वाहून गेलेल्या रोवण्याच्या जागी पुन्हा रोवणे करणे अशक्य आहे. त्यामुळे तेवढी जागा पडीक राहणार आहे. दोन दिवस शेतातच राहिल्यास धानपीक सडण्याची शक्यता आहे.