युवा केंद्राच्या लेखापालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:15 AM2019-04-05T00:15:00+5:302019-04-05T00:15:41+5:30
गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले.
नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवा मंडळांना जनजागृतीपर कार्यक्रम दिले जातात. युवा मंडळाने केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी मिश्रा याने सात हजार रुपयांची मागणी युवा मंडळाच्या संचालकास केली होती. मात्र युवा मंडळाच्या संचालकाने याबाबतची तक्रार सीबीआयकडे केली. त्यानुसार सीबीआयने बुधवारी सापळा रचून मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना त्याच्या कार्यालयातच रंगेहात पकडले. नेहरू युवा केंद्र हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने युवा मंडळाच्या संचालकाने नागपूर सीबीआयकडे तक्रार केली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
नेहरू युवा केंद्रात जिल्हा समन्वयक हे मुख्य पद आहे. मात्र या पदावर नेहमी प्रभारी व्यक्तीची नियुक्ती राहात असल्याने गडचिरोली नेहरू युवा केंद्राचा पूर्ण कारभार मिश्रा स्वत:च सांभाळतो. अनेक कार्यक्रम कागदावर दाखवून निधी हडपला जात असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. ज्या स्वयंसेवी संस्थांना काम उपलब्ध होते त्यांच्याकडून पैशाची मागणी करीत असल्याने स्वयंसेवी संस्थांचे संचालक त्रस्त झाले होते.
नियम डावलून आपल्या मर्जीतीलच संस्थांना कामे देत असल्याने इतर संस्था संचालकांचा मिश्रा याच्यावर मागील काही वर्षांपासून चांगलाच रोष होता.
२६ हजाराच्या बिलासाठी १० हजारांची मागणी
तक्रारकर्त्या युवा मंडळाने जनजागृतीपर कार्यक्रम केले होते. त्याबाबतचे बिल २६ हजार रूपयांचे होते. विशेष म्हणजे मिश्रा याने २६ हजार रूपयांचे बिल संबंधित युवा मंडळाच्या खात्यात जमा केल्यानंतर युवा मंडळाच्या संचालकाकडून मिश्रा याने तब्बल १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी सात हजार देण्याचे ठरले. लाचेची मागणी ही एकूण बिलाच्या ३८.४६ टक्के आहे. १० हजारांची लाच दिल्यानंतर युवा मंडळाकडे केवळ १६ हजार रूपये राहात होते. १६ हजार रूपयांत युवा मंडळ कार्यक्रम कसा काय राबविणार? असा प्रश्न निर्माण होतो.
कारभाराची चौकशी करा
नेहरू युवा केंद्रामार्फत दरवर्षी मानधन तत्त्वावर स्वयंसेवकांची नेमणुक केली जाते. मात्र त्यांचीही नेमणुक पैसे घेतल्याशिवाय करीत नव्हता, असा आरोप माजी स्वयंसेवकांनी केला आहे. विशेष म्हणजे मिश्रा हा गडचिरोली येथे मागील १० वर्षांपासून कार्यरत होता. अनेकवेळा बदली होऊनही त्याने बदली रद्द केली आहे. मागील १० वर्षातील आर्थिक व्यवहारांची चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.