आॅडिटरच्या चौकशीस टाळाटाळ

By admin | Published: August 4, 2014 11:44 PM2014-08-04T23:44:52+5:302014-08-04T23:44:52+5:30

येथील प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरूद्ध ४३ लाख ७१ हजार ८३५ रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संचालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. परंतु सरकारी आॅडिटरची

Avoiding the auditor's inquiry | आॅडिटरच्या चौकशीस टाळाटाळ

आॅडिटरच्या चौकशीस टाळाटाळ

Next

आष्टी : येथील प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरूद्ध ४३ लाख ७१ हजार ८३५ रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संचालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. परंतु सरकारी आॅडिटरची रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही, अशी टाळाटाळीची भूमिका पोलिसांनी घेतल्याने व्यवस्थापकाविरूद्ध पोलीस कारवाईला विलंब होत आहे. त्यामुळे असंख्य खातेदार पैसा कधी मिळणार या विवंचनेत आहेत.
प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेत २००४ ते २०१४ पर्यंत नरेंद्र शेंडे हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. बँकेतील पैशांचा संपूर्ण व्यवहार शेंडे यांच्याकडे होता. एप्रिल २०१४ मध्ये बँकेचे खातेदार शेंडे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता, त्यांनी बँकेत पैसे नाही म्हणून टाळाटाळ केली व खातेदारांना परत पाठविले. त्यानंतर शेंडे यांनी बँकेच्या पैशाची अफरातफर केली असल्याचा हा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर खातेदारांनी अध्यक्ष सिंधू दुर्गे यांच्याकडे धाव घेतली. व्यवस्थापक शेंडे यांनी आॅडिट केल्यानंतर खातेदारांना पैशे परत करू, असे सांगितले. दरम्यान मे २०१४ मध्ये नरेंद्र शेंडे यांनी आपल्या मर्जीतील आॅडिटर बोलावून आॅडीट करवून घेतले. त्यामध्ये ४६ लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले.
बँकेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी १४ एप्रिल रोजी मुलचेरा पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु पोलीस कारवाई न झाल्याने २९ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली व ७ मे रोेजी सहाय्यक निबंधक चामोर्शी यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही व्यवस्थापकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर संचालक मंडळाने लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे पत्र २१ जुलै २०१४ रोजी दिले. यादरम्यान संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक अहेरी यांच्याकडेही तक्रार केली.
जिल्हा उपनिबंधक अहेरी यांनी चामोर्शीचे सहाय्यक निबंधक गणवीर यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटूनही चौकशी करण्यात आली नाही. ३१ जुलै २०१४ पर्यंत आॅडीट करण्याचे निश्चित झाल्यानंतरही कुठलीही कारवाई जिल्हा निबंधक यांच्याकडून अजूनपर्यंत करण्यात आली नाही. संचालक मंडळ व खातेदार ४ आॅगस्टला जिल्हा निबंधकाकडे तक्रार करणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष सिंधू दुर्गे यांनी दिली आहे.
पैशाच्या अफरातफर प्रकरणात जिल्हा उपनिबंधक अहेरी यांच्या आदेशालाही चामोर्शीच्या उपनिबंधकाने केराची टोपली दाखविल्याने जिल्हा निबंधक कुठली कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Avoiding the auditor's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.