सिराज पठान
गडचिरोली : येथील तालुका पशुचिकित्सालयात परिचर पदावर कार्यरत बेबीनंदा बुधा पेंदोर टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’या बौद्धिक क्षमतेवर आधारित रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सुपर-१० स्पर्धकांमध्ये त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे सुपरस्टार अभिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर बसण्याची संधी त्यांना मिळू शकते. गडचिरोलीसारख्या मागास, आदिवासीबहुल भागातील एका चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलेला प्रथमच अशी संधी मिळाली आहे.
मुंबई येथील या कार्यक्रमासाठी व्हिडिओ शूटिंग करणारी चमू गुरुवारी कुरखेडात पोहोचली. बेबीनंदा कार्यरत असलेल्या पशुचिकित्सालयाला त्यांनी भेट दिली आणि त्या करीत असलेल्या दैनंदिन सेवाकार्याचे चित्रीकरण त्यांनी केले. तसेच त्यांच्या कामकाजाशी संबंधित असलेले पशुचिकित्सालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद भामरे आणि शेजारी राहणारे सागर घोडीचोर यांची भेट घेऊन बेबीनंदा यांच्याशी संबंधित माहितीसुद्धा त्यांच्या तोंडून घेऊन ती चित्रबद्ध केली.
बेबीनंदा पेंदोर यांच्या सहभागाच्या एपीसोडचे चित्रीकरण येत्या १९ जुलै रोजी मुंबई येथे होणार आहे. या शो मध्ये सहभागी १० लोकांना अमिताभ बच्चन एक प्रश्न विचारतील. सर्वांत आधी अचूक उत्तर देणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष हॉट सीटवर अमिताभ यांच्यासोबत बसून बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
अशी झाली निवड प्रक्रिया
यावेळी ‘लोकमत’ने बेबीनंदा यांच्याशी संवाद साधत झालेल्या निवड प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांसाठी दररोज एक प्रश्न विचारण्यात येतो. या प्रश्नाचे उत्तर २४ तासांच्या आत ऑनलाइन स्वरूपात द्यायचे असते. मी नियमित या प्रश्नाचे उत्तर देत होते. यानंतर मला १५ जून रोजी या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मुंबई येथे बोलावले. त्या ठिकाणी सामान्यज्ञान या विषयावर एक पेपर सोडवायला देऊन प्रत्यक्ष मुलाखतही घेतली. यानंतर सुपर-१० मध्ये सहभागी होण्यासाठी माझी निवड झाली.
यापूर्वी डॉ. आमटे केबीसीमध्ये
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या बेबीनंदा गडचिरोली जिल्ह्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी पद्मश्री डाॅ. प्रकाश आमटे यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना केबीसीकडून विशेष निमंत्रित म्हणून सहभागी करून घेतले होते.