शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:33+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संपूर्ण जिल्हाभरात दीड हजारांवर शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शाळांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी अडचण जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दरवर्षी बदली प्रक्रिया राबवूनही अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची पदे भरली जात नाहीत. परिणामी चार शिक्षकी शाळेत दोन शिक्षक व दोन शिक्षकी शाळेत एकाच शिक्षकावर भागवावे लागते. दुर्गम शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम राहात असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यावर्षीही ही स्थिती कायम आहे. बाराही तालुके मिळून या जिल्ह्यात जवळपास प्राथमिक शिक्षकांची एकूण २५९ पदे रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संपूर्ण जिल्हाभरात दीड हजारांवर शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शाळांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी अडचण जात आहे. शाळास्तरावरही शिक्षकांची वाणवा असल्याने पालकांकडून सातत्याने ओरड होत आहे.
शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर अनेक गावातील पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोको आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने संबंधित शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करून पालकांचा रोष शमविण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या वतीने ही उपाययोजना दरवर्षी केली जाते. मात्र पुन्हा दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहात आहेत.
जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात एकूण प्राथमिक शिक्षकांच्या २५९ जागा रिक्त आहेत. यामुळे गडचिरोली तालुक्यात ११, आरमोरी तालुक्यात १३, कुरखेडा २, धानोरा ६, चामोर्शी ३७, देसाईगंज १२, मुलचेरा तालुक्यात १३ पदे रिक्त आहेत.
विशेष म्हणजे, अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी या तालुक्यात एकूण १६५ पदे रिक्त आहेत. याशिवाय मुख्याध्यापकांची २५ पदे रिक्त आहेत. एटापल्ली व धानोरा तालुका वगळता इतर १० तालुक्यातील शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापकांवरच शाळेचा कारभार सांभाळल्या जात आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक विविध कारणे प्रशासनाकडे पुढे करून शहरी भागातील शाळांमध्ये आपली पदस्थापना मिळवून घेतात. दुर्गम भागात बदली झाली तरी त्या ठिकाणच्या शाळेमध्ये रूजू होण्यास तयार होत नाही, असा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांमध्ये शिक्षकांची पदे अधिकाधिक रिक्त राहतात.
अशी होईल प्रक्रिया
राज्याच्या ग्राम विकास विभागाने ४ सप्टेंबर २०१९ रोजी प्राथमिक शिक्षकांच्या समुपदेशनाने बदली प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या संदर्भात पत्रही काढले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून निवड झालेले ७९ शिक्षक, आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेले ३१ शिक्षक, न्यायालयीन प्रक्रियेतील ७९ शिक्षक व विस्थापित झालेल्या १७ शिक्षकांच्या समुपदेशनाने बदल्या होणार आहे.
आज जि.प.मध्ये समुपदेशनाने बदली प्रक्रिया
जिल्हा परिषद शिक्षकांच्या १२ सप्टेंबर रोजी गुरूवारला जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात समुपदेशनाने बदल्या होणार आहेत. या बदली प्रक्रियेच्या माध्यमातून अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांमध्ये शिक्षकांची सर्व रिक्त पदे भरली जावीत, जेणेकरून दुर्गम शाळांची गुणवत्ता उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुर्गम भागातील शिक्षकांना न्याय देण्याची मागणी
गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील विस्थापित झालेल्या ४०० शिक्षकांना दुर्गम भागातील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली होती. एक वर्षानंतर आपली बदली शहरी भागातील शाळांमध्ये होईल, अशी अपेक्षा या शिक्षकांनी बाळगली होती. मात्र त्यांना यापूर्वीच्या बदली प्रक्रियेत न्याय मिळाला नाही. परिणामी त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या संदर्भात जि.प. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे.