गडचिराेली : ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त कृषी कर्जाची वसुली व्हावी, यासाठी बँक कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाेहाेचून कृषी कर्जाचा भरणा करावा, असे आवाहन करीत आहेत.
बँकांमार्फत शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाते. या कृषी कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी केल्यास संपूर्ण व्याज माफ केले जाते. शेतकऱ्याला केवळ मुद्दल रक्कम भरावी लागते. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी बहुतांश शेतकरी कृषी कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करतात. मात्र काही शेतकरी आर्थिक अडचणीत राहत असल्याने ते ३१ मार्चपूर्वी कर्ज भरत नाही. अशा शेतकऱ्यांना आठवण करून देण्यासाठी बँक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कर्ज भरण्याचे आवाहन करीत आहेत. लगेच एक महिन्यात दुसरे कर्ज मिळणार असल्याने शेतकरी, बचत गट व इतर नातेवाईकांकडून तात्पुरते कर्ज मागून कृषी कर्जाचा भरणा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शनिवारी चाैथा शनिवार असल्याने सुटी राहणार आहे. तसेच रविवारी व साेमवारी सुध्दा सुटी आहे. मंगळवार व बुधवार हे दाेन दिवस कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध हाेणार आहेत. त्यादृष्टीने शेतकरी पैशाची जमवाजमव करीत असल्याचे दिसून येत आहे.