लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुखकर्ता-दु:खहर्ता म्हणून ज्या देवतेला मोठ्या भक्तिभावाने पुजले जाते त्या गणेशाच्या १० दिवसीय उत्सवाला शुक्रवारपासून जिल्हाभर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा असल्या तरी ३०० सार्वजनिक मंडळांकडून कोरोनाचे नियम पाळत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय २५०० ते ३००० घरांमध्ये बाप्पाला विराजमान करण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड सुरू होती. गडचिरोलीत दरवर्षी इंदिरा गांधी चौक, मूल रोड, चामोर्शी रोडवर मूर्ती विक्रेते आपापली दुकाने थाटून बसत होते. यावर्षी मात्र मूर्तिकारांनी प्रशासनाच्या सहकार्याने धानोरा मार्गावरील जागेत शामियाना उभारून एकाच प्रांगणात मूर्ती विकण्याची सुविधा केल्याने नागरिकांच्याही सोयीचे झाले. विशेष म्हणजे त्यात पीओपीच्या मूर्ती विक्री करण्यास सर्व मूर्तिकारांनी सामूहिकपणे विरोध केल्याने हा यावेळच्या गणेशोत्सवातील महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. १०० पासून ते ४००० रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी होत्या.
ढोल-ताशे व गुलाल उधळण्यास बगलदरवर्षी सार्वजनिक मंडळांचे गणपती ढोल-ताशे लावून वाजत-गाजत मंडपात आणले जातात. पण, यावेळी प्रशासनाचे नियम पाळत ढोल-ताशे आणि गुलाल उधळून नाचत बाप्पाची मिरवणूक काढण्यास बगल देण्यात आली. केवळ गणपती बाप्पाचा जयघोष केला जात होता. घरगुती स्थापनेसाठीही उत्साहाने विविध वाहनांमधून मूर्ती नेल्या जात होत्या.
पाच दिवस चालणार विसर्जनजिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळे पाच दिवस गणेशमूर्तींची विसर्जन गाव तलाव, नदी, नाले, आदी ठिकाणी होणार आहे. त्यात स्थापनेपासून सातव्या दिवशी (दि. १६) विसर्जनाला सुरुवात होईल. शेवटचे मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन दि.२० रोजी होणार आहे. हा उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करीत पार पाडण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त लावला आहे.
१५० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’गावातील एकोपा कायम राहावा आणि सर्वांनी सोबत उत्सव साजरा करावा या भावनेतून प्रशासनाकडून ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जाते. त्यानुसार यावर्षी १५० गावांमध्ये ही संकल्पना राबविली जात आहे. त्यात गडचिरोली उपविभागातील ४४, कुरखेडा उपविभागातील ४०, धानोरा ७, पेंढरी (कारवाफा) ९, अहेरी १०, जिमलगट्टा ५, सिरोंचा २७ आणि एटापल्ली उपविभागात आठ गावांचा समावेश आहे.