विकासासाठी कटिबद्ध होऊ या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:25 AM2018-06-24T00:25:28+5:302018-06-24T00:27:34+5:30
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी अशोक
चौधरी, प्रकल्प अधिकारी पठारे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी आ.कृष्णा गजबे म्हणाले की, गडचिरोली संवाद या चर्चासत्रात विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यात सकारात्मक विचार मंथन होवून विकासाचा प्रारुप आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे. त्यासोबत प्रशासनानी जिल्ह्यातील १२ तालुक्यातील पदाधिकारी व अधिकारी यांची स्वतंत्र बैठक बोलावून तेथील भौगोलिक, पारंपरिक परिस्थितीचा विचारविनीमय करुन एक आराखडा तयार केल्यास आपणास विकासाच्या योजना राबविण्यास निश्चित मदत होणार आहे. आजच्या स्थितीत शासकीय योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यास प्रशासन व लोकप्रतिनिधीचे समन्वय असून सर्व या विकास प्रक्रियेसाठी कटिबध्द असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
भारत सरकारच्या वन धन योजनेअंतर्गत ही एक संकल्पना समजून गौन वनउपज वनात राहणाऱ्या वनवासीना अधिक लाभाचे ठरेल अशी योजना आखावी. आणि कोणत्याही योजना कागदावरच न राहता त्या प्रत्यक्षात अंमलबजावणीत याव्यात अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केली. सर्व विभागांनी डेटा सादर करताना १०० टक्के सत्यतापूर्वक सादर केला पाहिजे. त्यामुळे आपणास पुढील योजनांची आखणी करताना चुका संभवणार नाही. दिलेल्या निर्देशांकाच्या व्यतिरिक्त गौण उपजावरील उद्योगावर भर दिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्यामुळे वनावर आधारीत सर्व बांबीचासुध्दा यामध्ये समावेश करावा असे सामाजिक सेवा संस्थाच्या प्रतिनिधीकडून मत व्यक्त झाले आहे. याबाबीचासुध्दा आपणास विचार करावयाचा आहे. आतापर्यंत झालेल्या विचार मंथनातून निघालेल्या निष्कर्षाचा विचार केल्यास आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे. तेव्हा सर्वांनी आपले कर्तव्य चोख बजावल्यास जिल्हा समृध्द करण्यास काही अडचणी येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
तत्पूर्वी शनिवारी झालेल्या संवाद सत्रातील विचार मंथनावर विचार विनिमय करण्यात आले. आणि गटनिहाय प्रश्न उत्तरांची नोंद टिपण्यात आली. या समोरोपीय कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराभाई हिरालाल, देवाजी तोफा, सृष्टी या संस्थेचे केशव गुरनूले, अहेरीचे अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, डॉ.प्रकाश पवार, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले तर, आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी केले.