गटार योजनेच्या कामाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:00 AM2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:33+5:30
गडचिरोली शहरात गटार योजना बांधण्याठी राज्य शासनाने सुमारे २० कोटी रूपयांचा निधी वर्षभरापूर्वी गडचिरोली नगर परिषदेला उपलब्ध करून दिला होता. योजनेचे अंदाजपत्रक ९५ कोटी रुपयांचे बनविण्यात आले होते. मात्र कामाच्या निविदा अंदाजीत किमतीपेक्षा अधिक किमतीच्या उपलब्ध होत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बहूप्रतीक्षित भूमिगत गटार योजनेच्या कामाला इंदिरानगर वॉर्डातून सुरूवात झाली आहे. पावसामुळे कामात काही प्रमाणात व्यत्यय निर्माण होत आहे. पाऊस थांबल्यानंतर या कामाला वेग येणार आहे.
गडचिरोली शहरात गटार योजना बांधण्याठी राज्य शासनाने सुमारे २० कोटी रूपयांचा निधी वर्षभरापूर्वी गडचिरोली नगर परिषदेला उपलब्ध करून दिला होता. योजनेचे अंदाजपत्रक ९५ कोटी रुपयांचे बनविण्यात आले होते. मात्र कामाच्या निविदा अंदाजीत किमतीपेक्षा अधिक किमतीच्या उपलब्ध होत होत्या. त्यामुळे निविदेची प्रक्रिया वर्षभर लांबली होती. जवळपास पाचव्यांदा काढलेल्या निविदेच्या वेळी सुरत येथील कंपनीला ९६ कोटी ५० लाख रूपयांना कंत्राट देण्यात आला आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील चार दिवसांपासून गटार योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या धानोरा मार्गावरील इंदिरा नगरातून कामाला सुरूवात झाली आहे. सततच्या पावसामुळे कामात व्यत्यय येत आहे. सध्या २५ मजुरांच्या सहायाने काम केले जात आहे. पावसाळा संपल्यानंतरच हे काम वेगाने सुरू होणार असून दोन वर्षात काम पूर्ण करून द्यायचे आहे. गटार लाईन सुमारे १०२ किमीची असली तरी संपूर्ण शहरातून गोळा झालेले पाणी वाहून जाईल, यासाठी पाईपलाईन टाकताना लेव्हल मेन्टेन केली जाणार आहे. यामुळे सखल भागात असलेल्या घरांपर्यंत ही योजना नेताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सखल भागातील काही घरे या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
रस्त्यांची ऐसीतैशी होणार
गटार लाईचे पाईप सुमारे चार ते पाच फूट खोलीवर रस्त्याच्या मध्यभागातून टाकले जात आहे. त्यासाठी रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदला जात आहे. त्यामुळे रत्यांची ऐशीतैशी होत आहे. पावसामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल निर्माण झाला आहे. अशाच पद्धतीने शहरातील प्रत्येक वॉर्डात काम केले जाणार आहे. यात डांबरी व सिमेंट काँक्रीटचे रस्ते पुन्हा फूटण्याची शक्यता आहे.
गटारातील पाणी वापरणार शेतीसाठी
कोणत्या वॉर्डातून किती फुट खोल पाईपलाईन टाकायची याचा नकाशा तयार करण्यात आला आहे. गडचिरोली शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. बोरमाळा मार्गावर फिल्टर तयार केले जाणार आहे. संपूर्ण शहराचे पाणी या ठिकाणी जमा केले जाणार आहे. या ठिकाणी शुद्ध झालेले पाणी शेतीसाठी वापरले जाणार आहे. तसेच खत सुद्धा तयार होणार आहे.