पुलावरील मोठा खड्डा धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:50 PM2019-08-12T23:50:55+5:302019-08-12T23:56:09+5:30
येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
वैरागड परिसरातील अनेक रस्ते व पुलांची दुरवस्था झाली आहे. संबंधित यंत्रणेच्या वतीने योग्य नियोजन व कामात दर्जा ठेवला जात नसल्याने वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. सन २०१६ मध्ये वैलोचना नदीवर पुलाचे काम सुरू झाले. दोन वर्षात मोठ्या पुलाचे काम पूर्ण होऊन सन २०१८ पासून या पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र गतवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावर मोठा खड्डा पडला. संबंधित कंत्राटदाराकडून हा खड्डा बुजविण्यात आला. मात्र यावर्षी सुद्धा त्याच खड्ड्यासमोर दुसरा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे भरधाव येणाºया वाहनाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरमोरी-वैरागड-अंगारा-मालेवाडा व परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावर नेहमी वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे वैलोचना नदीच्या पुलावर पडलेला खड्डा योग्य पद्धतीने बुजविण्यात यावा, तसेच इतर पुलांचीही दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.
आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
आरमोरी तालुक्याचा विस्तार वाढला असून अनेक गावात रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय वैरागड, मानापूर, देलनवाडी या भागातही दुरावस्था झालेल्या पुलामुळे पावसाळ्यात अनेक मार्गावरची वाहतूक विस्कळीत होत असते. मात्र या समस्येकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.