लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांपैकी चर्चेत असणाऱ्या गडचिरोली मतदार संघात सर्व शक्यतांना बाजुला सारत भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच आरमोरी मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे आमदार कृष्णा गजबे यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र बहुचर्चित अहेरी मतदार संघाचा निर्णय राखून ठेवल्यामुळे तेथील संभ्रमाचे धुके अजूनही कायम आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली मतदार संघातून डॉ.चंदा नितीन कोडवते यांची उमेदवारी जाहीर करत या मतदार संघातील रंगत वाढविली आहे.नामांकन दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीने गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी भाजपनेही या दोन्ही मतदार संघांमध्ये जुन्या उमेदवारांना पुन्हा उतरवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान सायंकाळी काँग्रेस नेत्यांनी गडचिरोलीतील उमेदवाराची घोषणा करताना या मतदार संघातून राष्टÑवादी काँग्रेसचा उमेदवार राहण्याच्या शक्यतेला पूर्णविराम दिला. आरमोरी मतदार संघात काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असली तरी दोन वेळा आमदार राहिलेल्या आनंदराव गेडाम यांना पुन्हा एक संधी दिली जात असल्याचे संकेत वडेट्टीवार यांनी दिले.दरम्यान मंगळवारी आरमोरी मतदार संघात बसपाचे बालकृष्ण श्रीराम सडमाके तर गडचिरोलीत आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे सतीश भैयाजी कुसराम यांनी नामांकन दाखल केले. याशिवाय अहेरीत आविसंचे (अपक्ष) दीपक आत्राम आणि अपक्ष अजय मलय्या आत्राम यांनी नामांकन दाखल केले. बुधवारी गांधी जयंतीची सुटी असल्याने गुरूवार आणि शुक्रवार या दिवसात नामांकन दाखल करणाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.गडचिरोलीत डॉ.देवराव होळी हे पक्षीय पातळीवर तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी निवडणुकीचा गड पुन्हा काबिज करण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. याशिवाय आरमोरीत कृष्णा गजबे यांचीही जुन्या आश्वासनांच्या पूर्ततेअभावी दमछाक होणार आहे.आरमोरी-अहेरीत बंडखोरीचे सावटआरमोरी मतदार संघात काँग्रेसकडून तिकीटासाठी इच्छुक असलेल्या आणि शासकीय सेवेचा त्याग करणाºया माधुरी मडावी तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याची शक्यता आहे. अहेरीत अम्ब्रिशराव आत्राम भाजपचे तिकीट न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्री येळदा गडचिरोली मतदार संघातून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दीपक आत्रामांची स्वतंत्र उडीअहेरी मतदार संघात आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते आणि माजी आमदार दीपक आत्राम यांनी तूर्त कोणत्याही मोठ्या पक्षांच्या दावणीला स्वत:ला बांधून न घेता मंगळवारी स्वतंत्रपणे आपले नामांकन दाखल केले. मात्र पुढील दोन दिवसात राजकीय उलथापालथी झाल्यास त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मरावबाबा भाजपकडे गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या अहेरी मतदार संघावर काँग्रेस दावा करणार असल्याचे स्पष्ट केले. दीपक आत्राम यांचे नाव न घेता त्या ठिकाणी आमच्याकडे सक्षम उमेदवारही असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.महिला सक्षमीकरणासाठी दिली संधी- वडेट्टीवारमंगळवारी सायंकाळी विधानसभेते विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रपरिषदेत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या वतीने डॉ.चंदा कोडवते निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. गेल्या पाच वर्षात विद्यमान भाजप आमदारांनी कोणतीच नवीन गोष्ट केली नाही. जी काही कामे झाली ती आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेली आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत महिला आमदार झाल्या नाही. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यासाठी डॉ.चंदा कोडवते या उच्चशिक्षित उमेदवाराला निवडणुकीत उतरवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी अॅड.राम मेश्राम, बंडोपंत मल्लेलवार, प्रभाकर वासेकर, डॉ.नितीन कोडवते आदी अनेक जण उपस्थित होते.
दोन आमदारांना भाजपकडून पुनर्संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 6:00 AM
नामांकन दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीने गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी भाजपनेही या दोन्ही मतदार संघांमध्ये जुन्या उमेदवारांना पुन्हा उतरवण्याचा निर्णय जाहीर केला.
ठळक मुद्देअहेरी अधांतरी : गडचिरोलीतून काँग्रेसच्या डॉ. चंदा कोडवते तर आरमोरीतून आनंदराव गेडाम