आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
मोकाट डुकरांचा हैदोस
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकराच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे आरोग्य धोक्यात आहे.
शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र, शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
सिंचन विहिरीऐवजी बोअर खोदून द्या
रांगी : शासनाच्या मार्फत बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत. मात्र, या विहिरींच्या पाण्याची पातळी खोलात गेली आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. या विहिरींना बोअर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
बसथांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे गायब आहेत.
मनोऱ्याची रेंज वाढवा
धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे. परंतु, त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही, आदी ठिकाणी भ्रमणध्वनीचे मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठे चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशुंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.
पट्ट्यांसाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. ही अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. अटीमुळे अनेक दावे प्रलंबित आहेत.
अहेरीत वाढले अतिक्रमण
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई हाेत नाही.
सिरकाेंडाजवळ पूल बांधा
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत, तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
स्वच्छतेचा पडला विसर
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक कार्यालयात पसरलेल्या घाणीमुळे शासकीय कार्यालयातील स्वच्छता पाळण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासला आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याने या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
कचरा व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
वसाचा निवारा जीर्ण
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्यांचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.