लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानक शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जागा व इतर अडचणी तत्काळ मार्गी लावून बस आगार व स्थानकाचे काम संबंधित यंत्रणेने लवकर हाती घ्यावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानकाच्या कामाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.सिरोंचा बस डेपो व आलापल्ली बस स्थानक हे दोन्ही विषय अहेरी विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत, आणि हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे.गडचिरोलीपासून अहेरी-सिरोंचा येथील अंतर १०० किमीच्यावर आहे. तसेच सिरोंचा जवळून तेलंगणा व छत्तीसगड येथील सीमा लागते. आता गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तिन्ही नद्यांवर मोठा पूल होत असल्याने सिरोंचा वरून या राज्यांकडे आंतरराज्यीय वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला सिरोंचा येथे बस आगार व आलापल्ली हे विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक असणे आवश्यक आहे. तशी या भागातील लोकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सरकारकडे सातत्याने या दोन्ही विषयांचा पाठपुरावा केला होता. यात त्यांना यश आले असून विद्यमान राज्य सरकारने सिरोंचा बस डेपो व आलापल्ली बस स्थानकाला मंजुरी दिली आहे. सदर डेपो व बसस्थानकाच्या कामात जागा व इतर काही अडचणी आहेत, त्या तात्काळ सोडवून हे दोन्ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या. येत्या एक महिन्यात पुन्हा एक बैठक घेऊन या दोन्ही विषयांचा आढावा आपण घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, महसूल विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.तेलंगणकडे वाहतूक वाढणारसिरोंचा येथे बसडेपो झाल्यास येथून लगतच्या तेंलगणा राज्याकडे महाराष्ट्र महामंडळाच्या वतीने बसफेऱ्या सुरू करता येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना तेलंगणा राज्याकडे आवागमन करण्यासाठी सोयीचे होणार आहे.
बस डेपो, स्थानकाचे काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:19 AM
सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानक शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जागा व इतर अडचणी तत्काळ मार्गी लावून बस आगार व स्थानकाचे काम संबंधित यंत्रणेने लवकर हाती घ्यावे,
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : बैठकीत जागेच्या कार्यवाहीचा आढावा