याला म्हणतात हिंमत! ९ महिन्यांची गरोदर महिला २३ कि.मी.चे अंतर चालून आली दवाखान्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:55 PM2020-07-07T12:55:51+5:302020-07-07T12:57:21+5:30
जंगलातील अवघड वळणे, काटे कुटे आणि नदी नाले पार करणे हे सोपे नाही. शहरातील माणसांना तर अवघडच. मात्र असा तब्बल २३ कि.मी. चाअवघड प्रवास एका गरोदर महिलेने पूर्ण केला.
रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बिनागुंडा परिसरात असलेल्या तुर्रेमर्का येथील रोशनी संतोष पोदाडी या २३ वर्षीय गरोदर मातेने तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंतचा चक्क २३ किमीचा प्रवास पायी पायी केला. त्यानंतर सदर महिलेला रूग्णवाहिकेने लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर महिलेने सुखरूपणे बालिकेला जन्म दिला, पण त्या महिलेची आपबिती ऐकूण डॉक्टरही अचंबित झाले.
तुर्रेमर्का हे गाव बिनागुंडापासून ५ किमी तर भामरागडपासून ४० किमी अंतरावर आहे. त्या परिसरात लाहेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्रसुतीसाठी येथील महिलांना लाहेरी येथेच यावे लागते.
लाहेरी ते तुर्रेमर्का दरम्यानचे अंतर २३ किमी आहे. डॉक्टरांनी लिहून दिल्यानुसार रोशनीच्या प्रसुतीची तारीख जवळ आली होती. त्यामुळे गावातील आशा वर्कर पार्वती उसेंडी हिने रोशनीला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती होण्याचा सल्ला दिला. लाहेरीपासून ६ किमी अंतरावरच गुंडेनूर नाला आहे. सदर नाला वाहण्यास सुरूवात होते. बिनागुंडा परिसरात एक पाऊस पडल्यानंतर वाहन जात नाही. त्यामुळे लाहेरीपर्यंतचे अंतर पायदळ गाठल्याशिवाय पर्याय नसतो.
रोशनीने सुमारे २3 किमी अंतर पायदळ चालून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. गुंडेनूर नाला ओसंडून वाहत असतानाही त्यातून वाट काढावी लागली. शुक्रवारी सकाळी १० वाजता रोशनी, तिचा पती, मोठा मुलगा आणि आशा वर्कर हे चौघेजण तुर्रेमर्का येथून निघाले. दुपारी २ वाजता ते लाहेरी येथे पोहोचले. लाहेरी येथून रूग्णवाहिकेने रोशनीला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. काही वेळातच रोशनी प्रसुत होऊन तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
विशेष म्हणजे, २3 किमी अंतर चालल्यानंतरही रोशनीच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यावरून दुर्गम भागातील आदिवासी महिलांच्या सुदृढ स्वास्थ्याची दृढ निश्चयाची कल्पना येते.