दिलीप दहेलकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : येथील गाेंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक असलेली २०० एकर जमीन आरमाेरी मार्गावरील अडपल्ली-गाेगावनजीक उपलब्ध आहे. विद्यापीठाने आतापर्यंत यातील ३५ एकर जागा खरेदी केली असून ती ताब्यातही घेतली आहे. उर्वरित १६५ एकर जागेसाठी सेमाना बायपास मार्गावरील जमीन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी धानोरा मार्गावरील जमीनही विचाराधीन असल्यामुळे विद्यापीठाचा कॅम्पस वेगवेगळ्या जागांवर विखुरल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या विद्यापीठासाठी लागणाऱ्या जागा खरेदी आणि अधिग्रहित करण्याबाबतचा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित गेला आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने जमिनीसाठीचा सर्व निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळता केला आहे. त्यामुळे जमिनीबाबतचा हा चेंडू आता जिल्हाधिकारी कशा पद्धतीने हाताळतात यावर विद्यापीठाच्या कॅम्पसचा विषय अवलंबून राहणार आहे.
गाेंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय सद्य:स्थितीत एमआयडीसी मार्गावर आहे. मात्र, त्या ठिकाणी विद्यापीठासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींसाठी व भाैतिक सुविधांसाठी जागा कमी पडत आहे. विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या जागेत प्रशासकीय भवन व परीक्षा कॅम्पस राहणार आहे. उर्वरित पदव्युत्तर वर्ग व इतर बाबींसाठी विद्यापीठाला जागेसह इमारतीची गरज आहे. त्याअनुषंगाने शासनाने जमीन खरेदीसाठी काेट्यवधी रुपयांचा निधी विद्यापीठाला उपलब्ध करून दिला आहे. जवळपास १२ काेटी रुपयांतून ३५ एकर जागा विद्यापीठाने खरेदी केली असून ती जमीन विद्यापीठाच्या नावे झाली आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत जमीन खरेदी व मूल्यमापन पद्धतीबाबत तक्रारी झाल्याने ही प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी वळता करून हा विषय त्यांच्याकडेच सुपुर्द केला आहे. जिल्हाधिकारी या प्रश्नाबाबत गंभीर असून येत्या काही दिवसांत जमिनीसाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(बॉक्स)
अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी प्रस्ताव सादर
गाेंडवाना विद्यापीठ संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी जागा व इमारतीची गरज आहे. दरम्यान, धानाेरा मार्गावरील बाेदलीनजीकच्या एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत सध्या रिकामी आहे. या संस्थेने ही इमारत विद्यापीठाला काॅलेजसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली असून तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. शासन याबाबतचा निर्णय घेणार आहे.
बाॅक्स...
उपकेंद्रासाठी चंद्रपुरात जागेचा शाेध
गाेंडवाना विद्यापीठाचे चंद्रपूर येथे उपकेंद्र निर्माण करण्याचे नियाेजन आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने चंद्रपूर येथील १० एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. या विषयावर २६ जूनला झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. या विषयावर पुढील सभेत निर्णय होऊ शकतो.
===Photopath===
280621\402528gad_1_28062021_30.jpg
===Caption===
28gdph34.jpg