कामाकडे दुर्लक्ष : ग्रामपंचायतीने महावितरणाला दिले पत्रमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील सर्वात शेवटचा भाग असलेल्या भाकरोंडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांचे खांब जीर्ण स्थितीत आले आहे. हे खांब केव्हाही कोसळून अपघात होण्याची शक्यता ग्रामपंचायतीने वर्तविली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीला पत्रही दिले आहे. ग्रा.पं. भाकरोंडी अंतर्गत खडकी, चिचटोला, भांसी, मेंढा, बाजीराव टोला, भुयान टोला, भाकरोंडी व कोसमटोला हे गाव येतात. या गावातील बहुतांशी वीज खांब हे बुडातून जीर्ण झालेले आहेत. अनेक ठिकाणी वायर लोंबलेले आहेत. जीर्ण झालेले खांब कधीही कोसळतील, अशा स्थितीत असून एक वर्षापूर्वी ग्रामपंचायत भाकरोंडीने ठराव घेऊन हे खांब बदलवून देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले असल्याचे सरपंच सरीता किरणशहा दुगा व उपसरपंच अंकूश श्रीराम काटेंगे यांनी म्हटले आहे. हे खांब बदलवून न दिल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने दिले जाणारे वीज बिल रोखून धरले जाईल, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.
भाकरोंडीतील जीर्ण विद्युत खांब कोसळण्याची शक्यता
By admin | Published: July 06, 2016 1:51 AM