गेल्या १५ ते २० दिवसांपासून विजेचे जाणे - येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून विजेअभावी नागरिक उष्णतेने त्रासून गेले आहेत. तसेच आईस्क्रीम दुकानदार व अन्य दुकानदारसुद्धा या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वीज खंडित होण्याचे कारण शोधून दुरुस्ती करायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी आष्टीत स्वतंत्र विद्युत फिडर देण्याची मागणी डॉ. भारत पांडे यांनी निवेदन देऊन केली होती. याकडे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आष्टीसारख्या मध्यवर्ती ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वीज वितरण कंपनीचा असा भोंगळ कारभार त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही विजेची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:35 AM