गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्यावतीने भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज ३१ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त्याने शहरातील इंदिरा गांधी चौक ते आयटीआय चौकापर्यंत ३ किमी अंतराचे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्यासह गडचिरोली शहरावासीय व विद्यार्थी धावले. इंदिरा गांधी चौकात एकता दौडमध्ये सहभागी होणाऱ्या उपस्थित सर्व नागरिक, विद्यार्थी, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी राष्ट्रीय, एकता, सुरक्षा व अखंडता अबाधित ठेवण्याची शपथ दिली. त्यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला. तसेच त्यांनी स्वत: या दौडचे नेतृत्वही केले. याप्रसंगी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुल्ला, भारत स्काऊट आणि गाईडस्चे जिल्हा चिटणीस एम. जी. राऊत, जिल्हा आयुक्त कविता पोरेड्डीवार, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त वाय. आर. मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या एकता दौडचा समारोप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सभागृहात करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रमोद दशमुखे यांनी केले. या कार्यक्रमात स्काऊट गाईडच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त सुधा सेता, जिल्हा संघटक मंजुषा जाधव, हेमंत कट्यारमल, देवानंद गव्हारे, श्रीकृष्ण ठाकरे, पुराम, गव्हारे, खंगार, रामटेके आदी उपस्थित होते. या एकता दौडमध्ये शहरातील स्कूल आॅफ स्कॉलर्स, राणी दुर्गावती कन्या विद्यालय, विद्याभारती कन्या हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल आदी शाळांचे स्काऊट गाईडस् व विद्यार्थी सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
शहरवासीयांसह जिल्हाधिकारी धावले
By admin | Published: November 01, 2014 1:02 AM