गणरायाचे उत्साहात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:22 PM2019-09-02T23:22:26+5:302019-09-02T23:22:53+5:30
खासगी गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. आकर्षक विद्युत रोषणाई व विविध सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने युवा मंडळींसाठी गणेशोत्सव ही एक पर्वणीच ठरते. सोमवारी पहाटेला पावसाने झोडपून काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घरातील आबालवृध्दांना आगमनाची प्रतीक्षा लागून असलेल्या गणरायाचे २ सप्टेंबर रोजी आगमन झाले. गणरायाची सजावट, पूजा व प्रतिष्ठापणेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची जुळवाजुळव करण्यात प्रत्येक भाविक व्यस्त असल्याचे दिसून येत होते. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रतिष्ठापणेचा मुहूर्त असल्याने अनेकांनी सायंकाळच्या सुमारास गणरायाची प्रतिष्ठापणा केली.
खासगी गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. आकर्षक विद्युत रोषणाई व विविध सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने युवा मंडळींसाठी गणेशोत्सव ही एक पर्वणीच ठरते. सोमवारी पहाटेला पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसा विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांची गैरसोय टळली. ग्रामीण भागात रोवण्यांची कामे आटोपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कामापासून उसंत मिळाली असल्याने ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण आहे. दरदिवशी पाऊस येत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांची दमछाक होणार आहे. प्रत्येक मंडळाला वॉटरप्रुफ मंडप टाकावा लागला आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.
गडचिरोलीतील मानाचा गणपती विराजमान
गडचिरोली शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्या घरी मांडला जात असलेल्या गणपतीला गडचिरोली शहराचा मानाचा गणपती म्हणून ओळख आहे. सोमवारी भजनाच्या गजरात मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. अनंत चतुर्थीच्या दिवशी पोरेड्डीवार यांच्या मार्फत विविध पारंपारिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे पाहण्यासाठी ग्रामीण भागातून हजारोंची गर्दी गडचिरोलीत उसळते.