शिवराजपूर मार्गाची दुरवस्था वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:28+5:302021-05-24T04:35:28+5:30
देसाईगंज : तालुक्यातील कुरुड फाटा, शिवराजपूर ते किन्हाळा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर मोठमोठे भगदाड पडले आहेत. संपूर्ण रस्ता ...
देसाईगंज : तालुक्यातील कुरुड फाटा, शिवराजपूर ते किन्हाळा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर मोठमोठे भगदाड पडले आहेत. संपूर्ण रस्ता उखडलेला असून मोठमोठे खड्डे पडलेले असूनही याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. अनेक वाहने क्षतिग्रस्त होऊन लहान-मोठे अपघात होत असल्याने या रस्त्याने आवागमन करताना जीव मुठीत धरून आवागमन करावे लागत आहे. परिणामी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील मोहटोला किन्हाळा हे गाव आजच्या स्थितीत कारल्याची बाजारपेठ म्हणून नावारूपास येत आहे. त्यातच या भागात वीटभट्टी कारखान्यात उच्च प्रतीच्या विटा निर्माण करण्यात येत असल्याने या गावांचे नावे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. मागील एक वर्षापूर्वी मोहटोला ते शिवराजपूरपर्यंत खड्ड्याची डागडुगी करण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच या मार्गावर मोठमोठे भगदाड पडल्याने व काही भागात संपूर्ण डांबरी रस्ता भकास होऊन गिट्टी उखळल्याने रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
दरम्यान, डांबरी रस्त्यावरील डांबर निघून डांबराच्या कडा तयार झाल्याने अनेक वाहने घसरून पडून अपघातग्रस्त झालेली आहेत. आजमितीस किन्हाळा-मोहटोला या मार्गावर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात फरीपर्यंतच डागडुगीचे काम करण्यात आले. हा मार्ग सरळ मार्ग कढोली कुरखेडापर्यंत शार्टकट असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सद्यस्थितीत कुरुड फाटा ते शिवराजपूर, फरी शिरपूर हा मार्ग बारमाही वाहतुकीचा मार्ग असल्याने येत्या पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करून मार्ग नव्याने पुन्हा वाहतुकीस मोकळा करण्यात आला नाही तर या मार्गांवरून आवागमन करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अनेक वाहने अपघातग्रस्त होऊन अनेकांना जीव गमावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण मार्गाचे नूतनीकरण करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.