आरमोरी शहरातही काँग्रेस माघारली

By admin | Published: May 19, 2014 11:31 PM2014-05-19T23:31:08+5:302014-05-19T23:31:08+5:30

आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या मोठे गाव असलेल्या आरमोरी गावात काँग्रेसला अत्यल्प मतदान मिळाले आहे.

Congress also withdrew in Armori city | आरमोरी शहरातही काँग्रेस माघारली

आरमोरी शहरातही काँग्रेस माघारली

Next

आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या मोठे गाव असलेल्या आरमोरी गावात काँग्रेसला अत्यल्प मतदान मिळाले आहे. भाजपने येथे ४ हजार ५८७ मताची आघाडी घेतली आहे. आरमोरी गावात १४ मतदान केंद्र होते. या सर्व मतदान केंद्रांवर भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. आरमोरी शहरात भाजपला ६ हजार २८४ मत मिळाले. तर काँग्रेस उमेदवाराला १ हजार ६९७ मते मिळाली. भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या उमेदवाराला ४५०, बहूजन समाज पार्टीच्या उमेदवाराला ६२९ तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला ३३७ मते मिळाली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात मागील १० वर्षापासून काँग्रेसचे आमदार आहेत ते आरमोरी गावातच राहणारे आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवणार्‍या काँग्रेसच्या सहकार गटाचेही मोठे जाळे आरमोरी गावात पसरलेले आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे १३ सदस्यीय आरमोरी ग्रामपंचायतीची सत्ता भारतीय कम्युनिष्ट पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीची आहे. आरमोरी जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचा सदस्य आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाला केवळ १६९७ मते मिळाली आहे. भाजपने येथे ४ हजार ५८७ मताची आघाडी मिळविली. मोदी लाट काँग्रेसविरोधी असलेला असंतोष, आमदारांविषयी असलेली नाराजी, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे या गावात काँग्रेसचे पानिपत झाले. असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तुलनेत भाजपला शिवसेनेची या निवडणुकीत मिळालेली मोठी साथ याशिवाय युवाशक्ती आघाडीचीही झालेली सोबत भाजपसाठी मोठी महत्वाची बाब ठरली. आरमोरी शहरात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणी बुथवर योग्य नियोजन केल्याने मतदान त्यांच्याकडे अधिक प्रमाणात वळते झाले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात तालुक्याच्या ग्रामीण भागातही भाजपने प्रचंड मुसंडी मारली आहे. वैरागड येथे चार मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्राववर भाजप आघाडीला मोठे मतदान मिळाले आहे. वैरागडात १ हजार ५४०, काँग्रेस उमेदवाराला ५३४ मते मिळाले आहे. वैरागडच्या एका मतदान केंद्रावर तर काँग्रेस उमेदवारापेक्षा बसपाचा उमेदवार आघाडीवर आहे. माजी आमदार राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिराम वरखडे यांच्या जोगीसाखरा गावात दोन मतदान केंद्र आहे. येथे भाजपला ६२३ मत मिळाले आहे तर काँग्रेसला ३०५ मते मिळाले आहे. इंजेवारी या मोठ्या गावात भाजपला ५०० तर काँग्रेसला ३८४ मत मिळाले आहे. ठाणेगावमध्येही तीन मतदान केंद्र आहे. येथे भाजपला १ हजार ३०६ तर काँग्रेसला ३१३ मते मिळाले आहे. चुरमुरा गावात काँग्रेसला १८५, भाजपला ४८० मते मिळाली आहे. आरमोरी तालुक्यातील दवंडी या गावात मात्र काँग्रेसला ३२९ व भाजपला १६०, भाकरोंडीमध्ेय काँग्रेसला २९१, भाजपला २६२ मतदान आहे. मुरमाळी येथेही काँग्रेसला ३०४ तर भाजपला १८४ मते मिळाले आहेत. अनेक मतदान केंद्रावर भाजपला दुहेरी आकड्यातील मतदानच मिळाले आहे. एकूण संपूर्ण तालुक्याची व आरमोरी गावाची मताधिक्य पाहिली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस या मतदार संघामध्ये १४ हजारावर अधिक मतांनी पिछाडीवर होती. या वर्षीच्या निवडणुकीतही ४३ हजार मतांनी काँग्रेसला दणका मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसने आता नव्याने निवडणुकीसाठी तयारी करावी लागणार आहे, असे जाणकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मोदीच्या लाटेत डाव्या पक्षाला आरमोरी गावासह मतदार संघातही प्रचंड फटका बसल्याचे भाकप उमेदवाराच्या मिळालेल्या ताधिक्यावरून दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे बर्‍यापैकी प्राबल्य आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनेक क्षेत्रात कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार तिसर्‍या स्थानावर होते. पक्षाच्यावतीने गावपातळीपर्यंत आंदोलने करून वृध्द लोकांनाही अनेक योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले. मात्र निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. (प्रतिनिधी)

Web Title: Congress also withdrew in Armori city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.