गडचिरोली : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळ्या तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळ्या आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे. साहित्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. बहुतांश स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वाॅर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
बसस्थानकातील पोलीस चौकी सुरू करा
गडचिरोली : महामंडळाचे गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा सदर पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते.
झेलिया गावाला रस्ता कधी मिळणार?
धानोरा : धानोरा या तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जंगलातून पायवाट तुडवत गाव गाठावे लागते. गावाला जातेवेळी दोन मोठमोठे नाले पडतात. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी राहत असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होते. हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. मात्र त्यानंतर रस्त्याचा अभाव आहे.
शाळांमध्ये शौचालयांचा अभाव
गडचिरोली : केंद्र शासनाने प्रत्येक शाळेत शौचालय असणे बंधनकारक करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शौचालय नाही. काही शाळांनी शौचालयाचे बांधकाम सुरू असून ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौचासाठी बाहेर जावे लागत आहे. सर्व शाळांमध्ये शाैचालय आणि पाण्याची पुरेशी सुविधा देण्याची गरज आहे.
बनावट मापांमुळे ग्राहकांची फसवणूक
गडचिरोली : ग्रामीण भागातील आठवडी बाजार व अन्य ठिकाणी गावोगावी जाऊन खासगी धान्य व इतर वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मापातील त्रुटीमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या धान्याची व किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे.
ग्रामीण भागात व्यायामशाळेची मागणी
गडचिरोली : ग्रामीण भागातील अनेक होतकरू तरुण आहेत. मात्र त्यांना अपुऱ्या सोयी-सुविधा मिळत असल्याने ते पुढे जाऊ शकत नाही. सैनिक भरती तसेच इतर भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुणांना व्यायामशाळेअभावी इतरत्र कसरत करावी लागत असल्याने आधुनिक सोयी-सुविधेपासून वंचित आहेत.
‘नो पार्किंग’चे फलक नावापुरतेच
गडचिरोली : शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘नो-पार्किंग’चे फलक लावले जातात. मात्र नेमका याच फलकासमोर दुचाकी वाहने लावली जातात. हे नियम सामान्य नागरिकांबरोबरच कार्यालयातील कर्मचारीसुद्धा पाळत नाही. त्यामुळे नो-पार्किंगच्या फलकासमोरच दुचाकी वाहने उभी असल्याचे प्रत्येक कार्यालयात दिसून येते.
पूर्णवेळ ग्रंथपाल नियुक्तीस अडचण
गडचिरोली : ५०१ ते १ हजारांपर्यंत एक अर्धवेळ व एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या अनुदानित माध्यमिक शाळेत पूर्णवेळ ग्रंथपाल पदाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने अनेक अनुदानित शाळेत ग्रंथपालाची पदे रिक्त आहेत.
कृषी यंत्र बँक हाेणार स्थापन
गडचिरेाली : मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बचत गटांचे पाच कृषी यंत्र बँक स्थापन करण्यासाठी गडचिराेली तालुक्यासाठी लक्षांक प्राप्त झाले आहे. यासाठी शेतकरी गटांनी १ मार्चपर्यंत तालुका कृषी अधिकारी गडचिराेली यांच्याकडे अर्ज सादर करावा. या याेजनेवर ९० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
उपहारगृहांमध्ये नियमांचे उल्लंघन
गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.
गांधी वॉर्डात फवारणीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या आहेत. यातील बहुतांश नाल्या उपसल्या जात नाही.
मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून, अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब फायदेशीर राहणार आहे.