गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. अशा अवस्थेत त्याच्या कौटुंबिक दुःखात गावकरी सहभागी होत गावातून लोकवर्गणी काढून त्याला आर्थिक हातभार देण्याचा प्रयत्न करीत असतात. गावातील मुख्य चौकात किवा वॉर्डात किवा मोहल्यात फिरून त्याची यादी तयार करून त्यात तांदूळ, डाळ, तिखट आदी स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य व पैसे गावकरी गोळा करीत असतात. काही गावात स्वयंपाक करून जेवण देत असतात, तर जमा झालेले पैसे तसेच तांदूळ, डाळ, तिखट आदी त्या मयत झालेल्या कुटुंबाला गावातील नागरिक पोहचवून असतात. गावातील चौकात गंज एकत्र दिसले की हमखास या गावातील कुणाचे तरी निधन झाले याचा अंदाज दिसून येतो.
अलीकडे माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. अशाही अवस्थेत दुःखाच्या सागरात बुडालेल्या कुटुंबाला आधार देत त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये या भावनेतून गावकरी हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवित आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा टिकून राहण्यास मदत झाली आहे