झाडावरच दाणापाण्याची केली सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:12 AM2019-04-17T00:12:42+5:302019-04-17T00:19:54+5:30
उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.
अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या नेतृत्वात ही समिती अहेरी जिल्हा निर्मितीसाठी मागील सात वर्षांपासून सातत्याने संघर्ष करीत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यातही ही संस्था पुढाकार घेत असल्याने अहेरी विभागात या समितीची विशेष ओळख आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. जंगल तसेच शेतशिवारातील नदी, नाले, तलाव निर्जल झाले आहेत. उष्णतेचा पारा ४४ अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याची पूर्वीपेक्षा अधिक गरज असताना जलसाठे आटले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना गावाकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय शिल्लक राहला नाही. जंगलात एखादा पाणवटा असल्यास त्या ठिकाणी पशुपक्षी गोळा होत असल्याने शिकारी टपूनच राहतात. अशा परिस्थितीत पक्ष्यांच्या चारा व पाण्याची सोय झाडावरच होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या मार्गदर्शनात अहेरी-महागाव मार्गावरील झाडांवर पाणी व चाºयासाठी पात्र बांधले आहेत.
एक किमी अंतरावरील पक्ष्यांसाठी सोय
अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या पुढाकारातून अहेरी-महागाव मार्गावरील जवळपास ५० वृक्षांना मातीचे पात्र बांधण्यात आले आहे. प्रत्येक वृक्षाला जवळपास पाच ते सहा पात्र बांधले आहेत. काही पात्रांमध्ये पाणी तर काही पात्रांमध्ये चारा टाकला जातो. महागाव मार्गावर पहाटेच्या सुमारास फिरायला जाणारे नागरिकही पात्रांमध्ये पाणी व चारा टाकत आहेत. त्यामुळे पक्षी बचाव ही चळवळ निर्माण होण्यास मदत झाली आहे. झाडावरच पाणी व चाºयाची सोय होत असल्याने झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. इतरही सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.