कोरोनामुळे लग्नातील अहेरावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:13+5:302021-04-29T04:28:13+5:30
लग्न सोहळ्यात सामान्य कुटुंब असले तरी किमान २५ ते ५० हजार रुपयांच्या भेटवस्तू सहज येतात. एवढेच नव्हेतर, पैशाच्या स्वरूपातही ...
लग्न सोहळ्यात सामान्य कुटुंब असले तरी किमान २५ ते ५० हजार रुपयांच्या भेटवस्तू सहज येतात. एवढेच नव्हेतर, पैशाच्या स्वरूपातही भेट दिली जाते. त्यामुळे वर-वधू यांना संसार मांडण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. मात्र लग्न सोहळ्यात किमान २५ लोकांची उपस्थिती व २ तासांत लग्न सोहळा पार पाडण्याचे बंधन असल्याने वर-वधू पक्षांकडील नातलग व इतर मंडळी लग्न सोहळ्याकडे पाठ फिरवीत सोशल मीडियावरून वर - वधूला शुभेच्छा देत आहेत. काही जणांनी लॉकडाऊनच्या काळात लग्न सोहळा न करता दिवाळीत करण्याचा निश्चय केला आहे.
लॉकडाऊन असल्याने कोणतेही सामान खरेदी करण्यासाठी दुकाने उपलब्ध नाहीत, त्यामुळे भेटवस्तू देणाऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनादिकाळापासून सुरू असलेल्या भेट प्रथेला कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही लगाम लागला आहे. नाहीतर लग्न सोहळ्यात हमखास फ्रीज, टीव्ही, कूलर, कपाट, दिवाण यासोबतच इतर किरकोळ वस्तूंची आरास लग्न मंडपात दिसून येत होती; मात्र कोरोना संकटाने लग्न सोहळ्यातून होणाऱ्या वारेमाप खर्चाची बचत झाली आहे. लॉकडाऊन कालावधीत झालेल्या लग्न सोहळ्यात बक्षीस पडले नसल्याने वर - वधू थोडे नाराज झाल्याचे चित्र आहे. तसेच लग्न सोहळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करणारे दुकानदार यांच्या व्यवसायावर मरगळ येऊन ऐन हंगामात त्यांच्यावर घरी रिकामे बसण्याची वेळ आली आहे.