लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गेल्या काही दिवसांपासून धानाेरा, कुरखेडा, देसाईगंज तालुक्यात उच्छाद मांडणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपाने पळसगाव परिसरात येऊन धानाच्या पुंजण्यांसह घरांचेही नुकसान केले. या परिसरात हत्तींनी मुक्काम ठोकल्याने भीतीमुळे लोकांनी रात्र जागून काढली. सध्या पाथरगाेटा परिसरात हत्तींचा वावर आहे.२२ जंगली हत्तींचा कळप शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डोंगरगाव हलबी रस्त्याने पळसगाव परिसरात आला. रात्रभर मुक्काम करून घराशेजारील वाड्या, धानाचे पुंजणे तसेच घरांचेही नुकसान केले. हत्तींच्या कळपाने देवराव उरकुडे यांच्या घराचे नुकसान केले. तसेच घरालगत असलेला भाजीपाला, परसबाग उद्ध्वस्त केली. पहाटे ४ वाजेपर्यंत नासधूस सुरूच हाेती. याशिवाय पाथरगोटा येथील नामदेव करांकर यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांची नासाडी केली. बाबूराव मने यांच्या शैतातील बोरवेलचे पाइप फोडले, बाळकृष्ण नखाते, आत्माराम नाकतोडे, तिमाजी बनकर, दुधराम हजारे, केशव उरकुडे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद, मूग, तका, तूर पिकांचे नुकसान केले. सध्या हा कळप पाथरगोटा तलावालगत जंगल परिसरात असल्याची माहिती आहे. वनविभागाने परिसरातील लोकांना सावध करून जंगलात जनावरे चारण्यासाठी जाऊ नये, अशी सूचनाही दिली आहे. जंगली हत्तींच्या कळपाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी राकाँचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम व सरपंच जयश्री दडमल यांच्यासह शेतकऱ्यांनी वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या जवळपास दाेन महिन्यांपासून जिल्ह्यात वावरत असलेल्या जंगली हत्तींच्या कळपाने आतापर्यंत धानाेरा, कुरखेडा आणि देसाईगंज तालुक्यात नुकसान केले आहे. यापुढे ते कुठे जाणार, असा प्रश्न पडला आहे.