मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा
By admin | Published: February 27, 2015 12:32 AM2015-02-27T00:32:05+5:302015-02-27T00:32:05+5:30
मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो.
भंडारा : मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. इतकेच नाही तर एका प्रयोगानुसार गरोदरपणाच्या काळात मोबाईलच्या वापरामुळे त्याच्यातून निघणारी किरणे होणाऱ्या बालकांवर नकारात्मक प्रभाव टाकतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या किरणांचा मोठा प्रभाव हृदयावरही पडतो. माणूस हा विद्युत संवेदनशील म्हणजे इलेक्ट्रिकली सेन्सेटिव्ह असतो. जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मोबाईलमधून येतात, तेव्हा ते हृदयाला प्रभावित करतात. याच्या अधिक वापरामुळे इतर काही लक्षणेही दिसतात. यामध्ये डोक्याच्या त्वचेमध्ये जळजळ होणे, थकवा येणे, झोप न येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थपणा, हृदयाचे ठोके वाढणे इतकेच नाही तर पचनक्रियेवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. युरोपीय रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधनानुसार मोबाईलमधून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे किडनी स्टोन किंवा आरोग्यासंबंधी अन्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या वापरामुळे कर्करोग झाला असे सांगण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा नसतो. कारण मोबाईल वापरण्याआधीची आकडेवारी, मोबाईल वापरल्यानंतरची आकडेवारी, तसेच मोबाईल किती प्रमाणात वापरला याची आकडेवारी आणि त्यातून सांख्यिकीदृष्ट्या काढलेला निष्कर्ष ही सगळी प्रक्रिया किचकट आहे. म्हणूनच याबाबतचे ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत, पण तरीही आपल्याला अनेक वर्षांपासून किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम माहीत असल्याने आपण त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करू शकतो. भारतात जवळपास ९० कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करतात.
रस्ता ओलांडताना, गाडी चालवताना, इतकेच नाही तर रेल्वे रुळ ओलांडतानादेखील माणसे मोबाईलवर बोलत असतात. त्यातूनच अपघाताच्या अनेक घटना घडतात, पण तरीही आपण जागृत होत नाही. ‘प्राण जाये पण मोबाईल न जाये’ अशी स्थिती आपल्याकडे आलेली दिसते, पण ही परिस्थिती खूप घातक आहे.