वृक्ष तोडीमुळे वन्यजीवांची वस्तीस्थाने सापडली धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:02 AM2019-05-19T00:02:09+5:302019-05-19T00:02:41+5:30
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.
वनांचा विकास करणे हे वन विकास महामंडळाचे काम आहे. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासून वडसा तालुक्यातील विहीरगाव, चिखली रिठ तसेच कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावलखेडा आणि आरमोरी तालुक्यातील सालमारा, वैरागड येथील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. १० वर्षांपूर्वी घनदाट दिसणारे जंगले आता उजाड माळरान झाली आहेत. या घनदाट जंगलात वाघ, हरिण, नीलगाय, अस्वल तसेच अन्य वन्यजीवांची निवासस्थान होते. हे निवासस्थान आता नष्ट झाले आहे. याला एफडीसीएमचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप संबंधित गावाच्या वनसंरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
वन्यप्राणी, वन व जैविक विविधता यावर प्रतिकूल परिणाम करणारी कोणतीही कृती थांबविण्यासाठी ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचे अनुपालन करणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा एफडीसीएमच्या वृक्षतोडीला ग्रामसभेने विरोध केला असता, संबंधित लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन बळाचा वापर करून वृक्षतोडीचे काम सुरूच ठेवण्यात आले. एफडीसीएमतर्फे जिल्ह्याच्या विविध भागात वृक्षतोडीचे काम सुरूच आहे. ही वृक्षतोड थांबवून वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर, भगवानपूर, वैरागड येथील नागरिकांनी केली आहे. जंगले विरळ झाले व जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यजीव रस्त्यावर येत आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने प्राणी गावाकडे धाव घेत आहे.
वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी जनजागृती हवी
पाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी गावालगतच्या पाणवठ्याच्या ठिकाणी आपली तहान भागविण्याकरिता येतात. अशा ठिकाणी शिकारी दबा धरून बसतात. परिणामी वन्यजीव मानवी फाशात अडकतात. हे सर्व प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्टÑाचे प्रभारी प्रफुल भाबुरकर व विदर्भ समन्वयक अनिल कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी १६ ते रोजी कुरखेडा, आरमोरी, वडसा तालुक्यातील वनक्षेत्राचा दौरा करून पाहणी केली होती.