दिना धरणाचे खोलीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:15+5:302021-04-29T04:28:15+5:30
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे ...
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्यात अशी मागणी आहे.
मार्गावरील खांबामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
जिल्ह्यात माडिया भाषेत शिक्षणाची सोय करा
गडचिरोली : दुर्गम भागात माडिया भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक व शाळा हा प्रवाह काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. मात्र त्या शाळा सुरू झाल्या नाहीत. हिंदी व बंगालीप्रमाणे माडिया भाषेतून शिक्षणाची सोय करण्याची मागणी आहे.
पांदण रस्त्यांवर अतिक्रमण वाढले
गडचिरोली : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.
वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार
गडचिरोली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
बालमजुरी कायद्याची अवहेलना सुरूच
कुरखेडा : जिल्ह्याच्या शहरी भागात हॉटेल, गॅरेज, चहा टपऱ्या व इतर दुकानांमध्ये अल्पवयीन मुले काम करीत आहेत. परिणामी बालमजुरी कायद्याची खुलेआम अवहेलना होत आहे. १६ वर्षांखालील बालकांना तुटपुंजी मजुरी देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
दस्तावेजांचा पसारा वाढला
गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाइलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या फाइल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाइलचा गट्टा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तावेजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे.
अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट
देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सिंचन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेंदिवस तलावांमधील अतिक्रमण वाढत चालले आहे. भविष्यातील ही धाेक्याची घंटा आहे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अंगणवाडी केंद्रांना इमारतींची प्रतीक्षा
आलापल्ली : अंगणवाडी बालकांना हक्काच्या इमारतीमधून ज्ञानाचे धडे गिरविण्यासाठी नाबार्ड व जिल्हा विकास निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र बांधकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र अनेक अंगणवाडींचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इमारत नसल्याने सुविधा मिळण्यास अडचण निर्माण हाेत आहे.