१० लाखांची मागणी, पाच लाख घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी सापळ्यात

By संजय तिपाले | Published: January 5, 2024 10:25 AM2024-01-05T10:25:08+5:302024-01-05T10:27:54+5:30

एसीबीची पेरमिली येथे कारवाई : मुरुमाचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाचखोरी.

demand of 10 lakhs while taking 5 lakhs forest area officer in trap | १० लाखांची मागणी, पाच लाख घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी सापळ्यात

१० लाखांची मागणी, पाच लाख घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी सापळ्यात

संजय तिपाले, गडचिरोली : रस्त्याच्या कामासाठी बेकायदेशीर उत्खनन करून वापरलेल्या मुरुमाचे ट्रॅक्टर पकडून ७२ लाखांचा दंड केला. दंडाची रक्कम  कमी करून ट्रॅक्टर सोडण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी करून पाच लाख स्वीकारणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला शासकीय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अहेरी तालुक्यातील दुर्गम पेरमिली येथे ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेनंतर ही कारवाई करण्यात आली.

प्रमोद आनंदराव जेनेकर (वय ३८) असे त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. तो अहेरीच्या पेरमिली वनपरिक्षेत्रात कार्यरत आहे. तुमरगुंडा- कासमपल्ली रस्त्याच्या कामासाठी बेकायदेशीर मुरूमाचा वापर केला जात होता. याची माहिती मिळताच वनविभागाने कारवाई करून ट्रॅक्टर पकडले. मुरुमाचा साठा जप्त केला. यानंतर संबंधित ट्रॅक्टर मालकास ७२ लाख रुपयांचा दंड केला. दंडाची रक्कम ७२ लाखांवरून ५ लाखांपर्यंत कमी करून ट्रॅक्टर सोडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर याने १० लाख रुपयांची मागणी केली, तडजोडीनंतर पाच लाख स्वीकारण्याचे ठरले.

दरम्यान, ट्रॅक्टरमालकाने याबाबत गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. ४ जानेवारी रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. यानंतर लगेचच रात्री पेरमिली निवासस्थानी सापळा लावला. ट्रॅक्टरमालकाकडून लाचेपोटी पाच लाख स्वीकारताच अधिकाऱ्यांनी झडप घालून प्रमोद जेनेकरला बेड्या ठोकल्या. पेरमिली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, हवालदार नरेश कस्तुरवार, पो.ना. किशोर जौंजारकर, पो.शि. संदीप घोरमोडे, संदीप उडाण  यांनी ही कारवाई केली.

लाचखोरी चव्हाट्यावर

जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक आहे. त्यामुळे वनउपज तस्करी तसेच वन क्षेत्रातील खनिज संपत्तीची लूट सर्रास केली जाते. यात काहींची अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा आरोप नेहमी होतो. पेरमिली येथील पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणाने वनविभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे.
 

Web Title: demand of 10 lakhs while taking 5 lakhs forest area officer in trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.