अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा (सीताबर्डी) येथील बदल पैदास केंद्राला आता सुगीचे दिवस येत आहेत. शेतकऱ्यांसाठी जोडधंदा असलेल्या बदल पालनाच्या व्यवसायासाठी आता येथील बदकांना राज्यातील अनेक जिल्ह्यांसह छत्तीसगडमधूनही मागणी होत आहे.पूर्व विदभार्तील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या तलावांच्या जिल्ह्यांसह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला जोडधंदा उपलब्ध होण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी विसोरानजीक बदक पैदास प्रक्षेत्र स्थापन करण्यात आले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रक्षेत्र प्रगतीचे पाऊल टाकत आहे. आता छत्तीसगड राज्यातील शेतकºयांनीही येथील बदक पिलांची खरेदी केली.
या प्रक्षेत्रामध्ये खाकी कॅम्पबेल जातीच्या बदकांची पैदास आणि विक्री केली जाते. अंडी उबवण क्षमतेनुसार बदक पिलांच्या विक्रीचे ऑर्डर बुक केले जातात. आता अंडी उबवण क्षमता वाढल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व सीमेला लागुन असलेल्या छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यातील शेतकºयांनी प्रक्षेत्रामधील बदक पिलांची खरेदी केली. तब्बल १००० ते १२०० खाकी कॅम्पबेल जातीच्या बदक पिलांची विक्री थेट राज्याबाहेर झाली आहे. छत्तीसगडसह पश्चिम बंगाल राज्यातूनही बदकांची मागणी होत असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.जी.सुकारे यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ८ ऑगस्ट १९८५ ला हे बदक पैदास प्रक्षेत्र स्थापन केले. प्रक्षेत्राचे आवश्यक बांधकाम पुर्ण न झाल्याने ३० ऑगस्ट १९९३ पर्यंत प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूर येथून कामकाज सुरू होते. सध्या या ठिकाणी ३०० मादी, ५० नर बदके आहेत. दररोज २०० अंडी प्रमाणे प्रतिमहिन्याला ६००० अंडी उपलब्ध होतात. अंडी उबवणीचा कालावधी २८ दिवसांचा आहे.
मनुष्यबळाचा कमतरताप्रक्षेत्रात १५,००० अंडी उबवण क्षमतेचे एक इंक्युबेटर आहे. परंतु बदकांची देखरेख आणि खाद्य पुरवण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. परिणामी शासनाने तत्काळ रिक्त पदे भरावी, जेणेकरून बदक पैदास क्षमतेत आणखी वाढ होऊ शकेल.