कागदोपत्री काम दाखवून देयक उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:03 AM2018-02-17T01:03:47+5:302018-02-17T01:03:58+5:30
जिल्हा परिषदेच्या धानोरा उपविभागाच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरूस्ती व सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम मंजूर करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
धानोरा : जिल्हा परिषदेच्या धानोरा उपविभागाच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरूस्ती व सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात कुठलेही काम न करता केवळ कागदोपत्री दुरूस्ती केल्याचे दाखवून एका कंत्राटदाराच्या नावे ८ लाख ८९ हजार ८२४ रूपयांचे देयक अदा करण्यात आले असून ही रक्कम संबंधित कंत्राटदाराने उचलल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
पं.स. सभापती अजमन राऊत व जि.प. सदस्य लता पुंगाटे यांचे स्वगाव असलेल्या मुरूमगाव येथील आरोग्य केंद्राची दुरूस्ती न करता साडेआठ लाख रूपयांचे देयकाची उचल करण्यात आली. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी दुरूस्तीच्या कामाकरिता १५ लाख रूपयांचा निधी प्रशासनाने मंजूर केला. या आरोग्य केंद्राची दुस्तीच करण्यात आली नाही. मात्र साडेआठ लाख रूपयांचा निधी गोविंदगाव ग्रा.पं. प्रशासनाने खर्च केल्याचे दाखवून कंत्राटदाराच्या नावे बिल काढले. २२ जुलै २०१७ रोजी कंत्राटदाराला धनादेश देण्यात आला. जि.प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता, संबंधित कंत्राटदार यांच्यामध्ये संगनमत करून हा प्रकार करण्यात आला. यापूर्वी ढोरगट्टा-खरगी-पयंडी रस्त्याचे काम थातुरमातूर करून १० लाख रूपयांचे बिल एका कंत्राटदाराला बाध्ांकाम विभागाने अदा केले. याबाबतचे वृत्त लोकमतने १६ जानेवारीला प्रकाशित केले होते.
अभियंत्यांसह ग्रा.पं. वर कारवाई करा
मुरूमगाव आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीचे काम न करता साडेआठ लाख रूपयांचे देयक संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात आले. या प्रकारामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता यांची भूमिका आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. सदस्य लता पुंगाटे यांनी केली आहे. सदर मुद्दा त्यांनी जि.प. च्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता, अशी माहिती पुंगाटे यांनी लोकमतला दिली आहे.
सदर निधीतून मुरूमगाव आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियागृह, शौचालय बांधकाम, फ्लोरिंग, स्टाईल व इतर सुविधा निर्माण करावयाच्या होत्या. मात्र काम न झाल्याने या सुविधा सध्यातरी कागदावर असल्याचे दिसून येत आहे.