डेंग्यूसदृश्य आजाराने एकजण दगावला
By admin | Published: May 17, 2014 11:42 PM2014-05-17T23:42:01+5:302014-05-17T23:42:01+5:30
चामोर्शी तालुक्यातील येनापूरवरून ३ किमी अंतरावर अलेल्या लक्ष्मणपूर या गावात गेल्या ८ ते १० दिवसापासून डेंग्यूसदृश्य तापाची साथ सुरू आहे.
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येनापूरवरून ३ किमी अंतरावर अलेल्या लक्ष्मणपूर या गावात गेल्या ८ ते १० दिवसापासून डेंग्यूसदृश्य तापाची साथ सुरू आहे. सध्या २५ ते ३० रूग्ण विषाणूजन्य तापाने फणफणत असून डेंग्यूसदृश्य तापाने या गावातील एक रूग्ण आज शनिवारी सकाळी चंद्रपूरच्या खाजगी रूग्णालयात दगावला. मृतकाचे नाव भाऊराव गौरकार (३२) रा. लक्ष्मणपूर असे आहे. हा इसम गेल्या ८ ते १० दिवसापासून विषाणूजन्य आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर येनापूरच्या आरोग्य पथकाच्या डॉक्टराच्या चमुने तपासणी करून औषधोपचार केला. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे पाहून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात १२ मे रोजी हलविल्याचे साथरोग अधिकारी डॉ. चौधरी यांनी लोकमतला सांगितले. मात्र भाऊराव गौरकार हा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल न होता, चंद्रपूरच्या खाजगी रूग्णालयात दाखल झाला असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले. मात्र उपचारादरम्यान आज शनिवारी त्याचा मृत्यू झाला. येनापूर आरोग्य पथक व तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मणपूर येथे गेल्या ७ ते १० दिवसापासून आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी दिली. लक्ष्मणपूर येथील विषाणूजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या १३ रूग्णांच्या रक्ताचे नमुने नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीकरिता पाठविले. यातील एक रूग्ण डेंग्यूबाधीत आढळून आल्याचे साथरोग अधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले. आज शनिवारी तापाचे ९ नवीन रूग्ण आढळले. रूग्णांवर डॉ. चलाख, डॉ. दाते उपचार करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)