कृषी विभागाने जप्त केले कापसाचे प्रतिबंधित बीटी बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 07:01 PM2021-05-20T19:01:01+5:302021-05-20T19:01:30+5:30
Gadchiroli news चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे शासन प्रतिबंधित एचटीबीटी या वाणाचे कापूस बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे शासन प्रतिबंधित एचटीबीटी या वाणाचे कापूस बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला.
दुर्गापूर येथील एका विक्रेत्यामार्फत सदर बियाणे विकले जातात असल्याची माहिती गुण नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस स्टेशन आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्या मदतीने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, मोहीम अधिकारी के.जी.दोनाडकर, कृषी अधिकारी चामोर्शी वसंत वळवी यांनी छापा टाकला. बोगस बियाणे विक्री करत असलेल्या दुर्गापूर येथील अशित तुषार मिस्त्री आणि पागल तारापद मंडल या दोन व्यक्तीच्या घरातून एकूण 104 कापूस बियाण्यांचे पॅकेट जप्त केले. त्यांची किंमत 78 हजार रुपये आहे.
संबंधित विक्रेत्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आष्टी येथे बुधवारच्या रात्री 10 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात कापूस घेण्यात येणाऱ्या पट्टयात कृषी केंद्राच्या तसेच संशयित गोदामांच्या ठिकाणी तपासण्या सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे एचटीबीटी बियाणे लागवड करू नये, शासन मान्यताप्राप्त वाणांचीच लागवड करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहेत.