निधी मिळूनही ७० लाभार्थ्यांनी शौचालय बांधलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:31 PM2019-09-02T23:31:42+5:302019-09-02T23:33:14+5:30
गडचिरोली शहराला गोदरीमुक्त बनविण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्याची जम्बो मोहीम हाती घेण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनुदानाची रक्कम अग्रीम स्वरूपात दिलेल्या ७० लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही. वर्षभरापासून या लाभार्थ्यांकडे पालिकेचे ५ लाख ४१ हजार रुपये प्रलंबित असल्याची माहिती हाती आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहराला गोदरीमुक्त बनविण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्याची जम्बो मोहीम हाती घेण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनुदानाची रक्कम अग्रीम स्वरूपात दिलेल्या ७० लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही. वर्षभरापासून या लाभार्थ्यांकडे पालिकेचे ५ लाख ४१ हजार रुपये प्रलंबित असल्याची माहिती हाती आली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात पालिकेच्या हद्दीतील बहुतांश वॉर्डात वैयक्तिक शौचालयाची मोहीम राबविण्यात आली. शौचालय नसणाऱ्या कुटुंबियांकडून अर्ज मागविण्यात आले. पालिका प्रशासनाकडे एकूण ३ हजार ३७१ अर्ज प्राप्त झाले. यापैकी पालिकेने २ हजार ८४८ अर्ज मंजूर केले. विविध त्रूटींमुळे ४७३ अर्ज नामंजूर करण्यात आले. मंजूर २ हजार ८४८ लाभार्थ्यांपैकी २ हजार ७३७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम १०० टक्के पूर्ण केले. या लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली. गडचिरोली शहरातील ३० वैयक्तिक शौचालय अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे.
शहराच्या विविध वॉर्डातील तब्बल ८१ लाभार्थ्यांनी शौचालयाच्या बांधकामाला सुरूवातच केली नाही. बांधकामाची सुरूवात न केलेल्या लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम पालिका प्रशासनाला परत करावी, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले होते. मात्र पालिकेचा पाठपुरावा कमी पडला. त्यामुळे ८१ लाभार्थ्यांपैकी केवळ ११ लाभार्थ्यांनी ७६ हजार रुपयांचा निधी पालिका प्रशासनाला परत केला. तब्बल ७० लाभार्थ्यांनी अद्यापही अनुदानाचा निधी पालिका प्रशासनाला परत केला नाही. लाभार्थ्यांकडून पालिका प्रशासनाला ५ लाख ४१ हजार रुपयांचा निधी येणे शिल्लक आहे.
२ आॅक्टोबर २०१९ गांधी जयंतीपर्यंत लाभार्थ्यांकडून ५ लाख ४१ हजार रुपयांचा निधी पालिकेला परत मिळणे आवश्यक आहे. मात्र या तारखेपर्यंत सदर निधी लाभार्थ्यांकडून वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात ५.४१ लाखांचा निधी भरणा करण्यात यावा. हा निधी स्वच्छ महाराष्टÑ अभियानाच्या अनुदान खात्यात भरणा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पालिकेला ओडीएफ प्लस व तीन स्टार मानांकन प्राप्त होणार नसल्याची शक्यता आहे.
कोट्यवधींची विकास कामे थंडबस्त्यात
राज्य सरकारच्या वतीने गडचिरोली पालिकेला विविध योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नगरोत्थान, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर निधी, पाणीपुरवठा विकास योजना व इतर योजनांच्या माध्यमातून रस्ते, नाली, सौंदर्यीकरण, पांदण रस्ते, नळ पाईपलाईन, पाणीटाकी व इतर अनेक कामांसाठी पालिकेकडे निधी उपलब्ध आहे. मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने बरीचशी विकास कामे गेल्या काही महिन्यांपासून थंडबस्त्यात पडले आहेत. निधी असूनही कामे होत नसल्याने शहरवासीय नाराज आहेत.